मुंबई : ‘द फॅमिली मॅन’ (The Family Man) या लोकप्रिय वेब सीरिजमधील श्रीकांत तिवारी जितका चर्चेत राहिला, तितकंच प्रेक्षकांच्या मनात घर केलं ते ‘जेके तळपदे’ या पात्रानं. अभिनेता शरीब हाश्मी (Sharib Hashmi) यानं साकारलेल्या या भूमिकेनं त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या शरीब हाश्मीला खऱ्या आयुष्यात मात्र एका कठीण संघर्षाचा सामना करावा लागत आहे. त्याची पत्नी नसरीन हाश्मी (Nasreen Hashmi) गेल्या अनेक वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत असून, आता सहाव्यांदा तिला या जीवघेण्या आजाराचं निदान झालं आहे.
नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये शरीब हाश्मी आणि त्याची पत्नी नसरीन यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक भावनिक गोष्टी शेअर केल्या. यावेळी बोलताना शरीबनं सांगितलं की, २०१८ मध्ये नसरीनला पहिल्यांदा तोंडाच्या कर्करोगाचं (Oral Cancer) निदान झालं होतं. त्यानंतर हा आजार पाच वेळा पुन्हा उद्भवला आणि आता सहाव्यांदा तो अधिक गंभीर स्वरूपात परतला आहे. यावेळी कर्करोग शरीरात मोठ्या प्रमाणात पसरल्याचं डॉक्टरांनी सांगितलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
https://prahaar.in/2026/05/14/cng-price-hike/
या कठीण प्रसंगाबद्दल बोलताना शरीब हाश्मी भावूक झाला. पाणावलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला, “नसरीनचा कर्करोग आधीच पाच वेळा परत आला आहे आणि आता सहाव्यांदा पुन्हा त्याच संकटाचा सामना करावा लागतोय. यावेळी आजार अधिक वाढला आहे. अशा परिस्थितीत मनात अनेक भीती, चिंता आणि नकारात्मक विचार येतात. पण नसरीन ज्या धैर्यानं या सगळ्याशी लढतेय, ते पाहून आम्हालाही बळ मिळतं.”
तो पुढे म्हणाला, “ती इतक्या ताकदीनं आणि सकारात्मकतेनं या परिस्थितीला सामोरी जाते की, तिच्या धैर्यामुळे संपूर्ण कुटुंबच लढायला शिकतं. तिच्या संघर्षातून आम्हीही खंबीर बनलो आहोत.”
नसरीननं सांगितलं की, जेव्हा शरीबला तिच्या कर्करोगाबद्दल पहिल्यांदा समजलं, तेव्हा तो पूर्णपणे कोलमडून गेला होता. मात्र त्यानं स्वतःला सावरत पत्नीच्या उपचारांसाठी दिवस-रात्र मेहनत घेतली. शरीब म्हणाला, “तिच्यावर आतापर्यंत पाच मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. प्रत्येक वेळी आम्हाला वाटायचं की आता सगळं ठीक होईल, पण पुन्हा काही काळानंतर आजार परत यायचा. आता सहाव्यांदा पुन्हा तोच संघर्ष सुरू झाला आहे. पण आम्हाला विश्वास आहे की, हे संकटही नक्की दूर होईल.”
https://prahaar.in/2026/05/13/dileep-raj-passes-away-by-heartattack/
नसरीननं या आजारामुळे होणाऱ्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासाबद्दलही स्पष्टपणे सांगितलं. ती म्हणाली, “कर्करोगाशी लढणं ही खूप लांब आणि वेदनादायी प्रक्रिया आहे. दर दीड वर्षांनी हा आजार पुन्हा उद्भवतो आणि प्रत्येक वेळी उपचारांसाठी मोठा खर्च करावा लागतो. या सगळ्यामुळे आर्थिक ताण प्रचंड वाढतो.”
भावूक होत ती पुढे म्हणाली, “हे सगळं अजिबात सोपं नाही. काही दिवस असे असतात की स्वतःकडे पाहणंसुद्धा कठीण वाटतं. एका स्त्रीसाठी चेहऱ्यावर पाच शस्त्रक्रिया होणं, स्वतःचा बदललेला चेहरा पाहणं आणि नीट बोलतानाही त्रास होणं… या सगळ्यामुळे मन खूप तुटतं. कधी कधी मी माझे जुने फोटो पाहते आणि विचार करते की, मी आधी किती वेगळी आणि सुंदर दिसायचे… आता मी पूर्णपणे बदलले आहे.”