Home ब्रेकिंग न्यूज Thane- Mulund Railway Station : ठाणे-मुलुंड दरम्यान नवे रेल्वे स्थानक केंद्र सरकारची तत्त्वतः मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश

Thane- Mulund Railway Station : ठाणे-मुलुंड दरम्यान नवे रेल्वे स्थानक केंद्र सरकारची तत्त्वतः मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश

0
Thane- Mulund Railway Station : ठाणे-मुलुंड दरम्यान नवे रेल्वे स्थानक केंद्र सरकारची तत्त्वतः मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश
Devendra Fadnavis

मुंबई : मुंबई आणि ठाणे या दोन शहरांमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांचा वाढता ताण लक्षात घेता, ठाणे आणि मुलुंड स्थानकांच्या दरम्यान एका नव्या उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या निर्मितीला केंद्र सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबतची माहिती दिली. या निर्णयामुळे मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, दळणवळणाला नवी गती मिळणार आहे.

ठाणे आणि मुलुंड ही मध्य रेल्वेवरील अत्यंत वर्दळीची स्थानके म्हणून ओळखली जातात. या दोन्ही स्थानकांमधील अंतर आणि तिथे होणारी प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी पाहता, या दरम्यान एका नवीन स्थानकाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या पत्रात मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत या नवीन स्थानकाच्या निर्मितीस हिरवा कंदील दाखवला आहे.

या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि गतिमान होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. नव्या स्थानकामुळे ठाणे आणि मुलुंड या दोन्ही स्थानकांवरील प्रवाशांचा भार हलका होणार असून, परिसरातील नागरिकांचा प्रवासाचा वेळही वाचणार आहे.

प्रकल्पाचे महत्त्व

मध्य रेल्वेवर ठाणे स्थानक हे सर्वात जास्त महसूल देणारे आणि सर्वाधिक गर्दीचे स्थानक आहे. मुलुंड आणि ठाणे दरम्यानच्या वाढत्या नागरीकरणामुळे या नवीन स्थानकाची गरज निर्माण झाली होती. केंद्र सरकारच्या तत्त्वतः मान्यतेनंतर आता या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष आराखड्याला आणि अंमलबजावणीला वेग येणार आहे. ठाणे मनोरुग्णालय परिसरात हे स्थानक उभारले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here