पुणे : मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर काल म्हणजेच मंगळवार ५ मे रोजी पहाटे एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक अपघात घडला. पवना चौक येथील ओव्हरब्रिजवर झालेल्या या दुर्घटनेत एका वेगाने धावणाऱ्या कारने लोखंडी कठड्याला जोरदार धडक दिल्यानंतर काही क्षणांतच कारला आग लागली. या आगीत चालकाचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
https://prahaar.in/2026/05/06/pune-parvati-crime-news-pune-shaken-again-50-year-old-man-attempts-to-rape-9-year-old-girl-grandfather-rapes-granddaughter/
घटनेच्या वेळी परिसरात मोठा स्फोटासारखा आवाज झाल्याने आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कुसगाव येथून घरी परतत असलेले दिनेश पिंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा आवाज ऐकताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कारमधील व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता इतकी जास्त होती की मदत करणे अशक्य झाले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती आणि चालकाचा मृत्यू झाला होता.
https://prahaar.in/2026/05/06/scooter-blast-near-bsf-headquarters-scooter-explosion-near-bsf-headquarters-excitement-in-jalandhar-investigation-underway-from-all-sides/
मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलिसांकडून वाहनाच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे माहिती गोळा केली जात आहे. तसेच, मृताच्या नातेवाइकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अपघाताच्या वेळी चालक एकटाच कारमध्ये असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी अतिवेग, चालकाचे नियंत्रण सुटणे किंवा तांत्रिक बिघाड या शक्यतांवर तपास सुरू आहे. पोलीस हवालदार दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.
https://prahaar.in/2026/05/06/nashik-tcs-case-four-suspects-in-tcs-case-remanded-in-judicial-custody/