अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक; बच्चू कडूंच्या नावावरून शिवसेनेत अंतर्गत विरोध
मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी १२ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे तीन दिवस उरले आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केलेली नाही. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीच्या वाट्याला आठ, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येणार असल्याचे स्पष्ट असले, तरी अंतर्गत कुरबुरी आणि इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे दोन्ही बाजूंच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
https://prahaar.in/2026/04/27/raghav-chaddha-approval-for-merger-of-those-7-aap-mps-including-raghav-chaddha-into-bjp/
राज्यातील नऊ सदस्यांची मुदत १७ मे रोजी संपत आहे. संख्याबळानुसार भाजपला पाच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळत आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेवर काँग्रेस आणि उबाठा यांपैकी कोण दावा करणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.
https://prahaar.in/2026/04/27/health-department-disciplinary-action-against-those-exerting-political-pressure-in-transfers/
भाजपची यादी दिल्लीत
दुसरीकडे, भाजपच्या गोटातून सुमारे ३० इच्छुकांच्या नावांची यादी दिल्लीत पाठवण्यात आली आहे. यापैकी पाच नावांवर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पक्षातील निष्ठावंत आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची गणिते पाहूनच ही नावे जाहीर केली जातील, असे समजते.
जय पवार की अनिकेत तटकरे?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) एका जागेसाठी अनेक दावेदार आहेत. अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे, आनंद परांजपे आणि उमेश पाटील यांची नावे चर्चेत असतानाच, मिटकरी यांनी केलेल्या एका मागणीमुळे खळबळ उडाली आहे. “अजितदादांची उणीव भरून काढण्याची क्षमता असलेल्या जय पवार यांना विधान परिषदेवर पाठवावे. हा आश्वासक चेहरा पक्षासाठी संजीवनी ठरेल,” असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे. त्यामुळे आता पक्ष कोणाला संधी देणार, जय पवार की अनिकेत तटकरे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.