Home ब्रेकिंग न्यूज Niyojan Bhavan : वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन इमारतीचे भूमिपूजन

Niyojan Bhavan : वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन इमारतीचे भूमिपूजन

0
Niyojan Bhavan : वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन इमारतीचे भूमिपूजन

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बांधण्यात येणाऱ्या नियोजन भवन इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज वांद्रे पूर्व येथे उत्साहात झाला. मुंबई उपनगरचे पालकमंत्री तसेच माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधिवत भूमिपूजन व कुदळ मारून या इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ केला. भूमिपूजन सोहळ्यास आमदार संजय उपाध्याय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच जिल्हा नियोजन अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जागेची पूजा अर्चना केली.

वांद्रे (पूर्व) येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात “नियोजन भवन” उभारण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र नियोजन भवन उभारण्याच्या सूचनेनुसार हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला १९ नोव्हेंबर २०२५ रोजी सुमारे ७४१.०४ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी तांत्रिक मान्यताही प्रदान करण्यात आली आहे. एकूण १०३१.२५ चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या या इमारतीचे काम दोन टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात तळमजला आणि एक मजला असलेली मुख्य इमारत उभारण्यात येणार आहे. यामध्ये ३०० आसनक्षमतेचे भव्य सभागृह, दोन स्वतंत्र ग्रीन रूम, किचन व पॅन्ट्री तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उभारल्या जाणार आहेत. पहिल्या मजल्यावर जिल्हा नियोजन समितीचे कार्यालय आणि लहान सभागृहाचीही व्यवस्था असेल. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात अंतर्गत सजावट, सभागृहाचे ध्वनीरोधक काम, फॉल्स सिलिंग, दरवाजे तसेच आवश्यक फर्निचर आणि इतर पूरक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री ॲड.शेलार यांनी सर्व संबंधितांना यावेळी दिल्या.