Home ब्रेकिंग न्यूज Devendra Fadanvis : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या अर्थकारणाला दिशा दिली

Devendra Fadanvis : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या अर्थकारणाला दिशा दिली

Devendra Fadanvis : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या अर्थकारणाला दिशा दिली
babasaheb ambedkar

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन

मुंबई : “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा विचार मांडण्यासह भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया रचण्यातही मोलाची भूमिका बजावली. रिझर्व्ह बँकेची स्थापना असो वा रुपयाच्या क्रयशक्तीचे जागतिक अर्थशास्त्रीय सिद्धांत, बाबासाहेबांच्या आर्थिक विचारांनी देशाच्या अर्थकारणाला खऱ्या अर्थाने दिशा दिली,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महामानवाला अभिवादन केले. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांनी बाबासाहेबांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

https://prahaar.in/2026/04/14/pratap-sarnaik-marathi-language-mandatory-for-licensed-rickshaw-and-taxi-drivers-from-may-1st/

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एक व्यक्ती समाजात किती मोठे परिवर्तन घडवू शकते, याचे जाज्वल्य उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी समतेचा मार्ग मोकळा केलाच, पण त्यांचे आर्थिक विचार आजही जागतिक स्तरावर मार्गदर्शक ठरत आहेत. भारतात केंद्रीय बँकेची गरज त्यांनीच अधोरेखित केली होती, ज्यातून पुढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.

“डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्यांकन करण्याच्या आजच्या काळात बाबासाहेबांनी मांडलेले विचार आजही समर्पक आहेत. निर्यातभिमुख अर्थव्यवस्थेत केवळ विनिमय दर महत्त्वाचे नसून रुपयाची क्रयशक्ती किती आहे, हे अधिक महत्त्वाचे असते, हा आर्थिक सिद्धांत बाबासाहेबांनी दशकांपूर्वी मांडला होता,” असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले. भगवान बुद्धांच्या शिकवणीतील ‘अत्त दीप भव’ हा संदेश बाबासाहेबांनी कृतीत आणून मानवकल्याणाचा मार्ग प्रशस्त केल्याचेही ते म्हणाले.

https://prahaar.in/2026/04/14/west-bengal-assembly-election-2026-mamata-banerjees-headache-increased-ed-arrests-mamata-banerjees-campaign-chief/

मान्यवरांची उपस्थिती

या अभिवादन सोहळ्यास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, ॲड. आशिष शेलार, संजय शिरसाट, संजय राठोड, छगन भुजबळ, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त चैत्यभूमी परिसरात अनुयायांची मोठी गर्दी झाली होती.