Tuesday, April 14, 2026

West Bengal Assembly Election 2026 : ममता बॅनर्जींची डोकेदुखी वाढली; ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या प्रमुखाला ईडीकडून अटक

West Bengal Assembly Election 2026 : ममता बॅनर्जींची डोकेदुखी वाढली; ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या प्रमुखाला ईडीकडून अटक

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने मोठी कारवाई करत I-PAC (इंडियन पॉलिटिकल अ‍ॅक्शन कमिटी) चे सहसंस्थापक आणि संचालक विनेश चंदेल यांना दिल्लीतून अटक केली आहे. याच I-PAC च्या कोलकाता कार्यालयावर यंदाच्या जानेवारीत ईडीने (ED) छापेमारी केली होती, तेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः तेथे पोहोचल्या होत्या.

कोण आहेत विनेश चंदेल ?

विनेश चंदेल हे I-PAC चे प्रमुख रणनीतीकार आहेत. प्रशांत किशोर, प्रतीक जैन आणि ऋषिराज सिंह यांच्यासह त्यांनी या राजकीय सल्लागार कंपनीची स्थापना केली होती. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) च्या निवडणूक प्रचाराचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक :

ईडीच्या माहितीनुसार, विनेश चंदेल यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर PMLA कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई बहुचर्चित ‘कोळसा घोटाळ्या’शी संबंधित आहे. तपास यंत्रणेनुसार, कोळसा चोरी आणि तस्करीतून मिळालेला कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा हवाला मार्गे I-PAC च्या खात्यांपर्यंत पोहोचवण्यात आला होता.

ममता बॅनर्जींची डोकेदुखी वाढली :

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही अटक झाल्याने ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ झाली आहे. या अटकेमुळे बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याआधी २ एप्रिल रोजी ईडीने दिल्ली, बेंगळुरू आणि मुंबईतील विविध ठिकाणी छापे टाकले होते. तसेच ८ जानेवारीला कोलकात्यातील I-PAC कार्यालय आणि प्रतीक जैन यांच्या निवासस्थानीही कारवाई करण्यात आली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >