Home महाराष्ट्र नाशिक Nashik : नाशिकमध्ये विनापरवाना परफ्यूम कारखान्यावर FDA चा छापा, 54 लाखांचा साठा जप्त

Nashik : नाशिकमध्ये विनापरवाना परफ्यूम कारखान्यावर FDA चा छापा, 54 लाखांचा साठा जप्त

0
Nashik : नाशिकमध्ये विनापरवाना परफ्यूम कारखान्यावर FDA चा छापा, 54 लाखांचा साठा जप्त
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

Nashik : नाशिकमध्ये विनापरवाना सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकरोडजवळील नांदूर गावात सुरू असलेल्या परफ्यूम उत्पादनाच्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) औषध विभागाने छापा टाकला. या कारवाईत तब्बल ५४ लाख ५१ हजार रुपये किमतीचा परफ्यूमचा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ३ हजार ३५२ पर,फ्यूमच्या बाटल्यांचा समावेश आहे. गुरुवारी (२६ नोव्हेंबर) ही कारवाई करण्यात आली.

सप्तशृंगीनगर येथील मे. डिजिप्रेन्युअर रिटेल प्रा. लि. या आस्थापनात विनापरवाना सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन सुरू असल्याची गोपनीय माहिती FDA च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर पथकाने प्राथमिक पडताळणी केली असता, तेथे तयार होणाऱ्या परफ्यूमच्या पॅकिंगवर उत्पादन परवाना क्रमांक नमूद नसल्याचे आढळून आले.

या पार्श्वभूमीवर FDA च्या पथकाने पंचांच्या उपस्थितीत संबंधित कारखान्यावर छापा टाकला. यावेळी संपूर्ण साठ्याचा पंचनामा करून ५४.५१ लाख रुपये किमतीचा परफ्यूम जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या उत्पादनांचे नमुने पुढील तपासणी आणि विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, संबंधित उत्पादक, उत्पादन प्रक्रिया आणि उत्पादन परवान्याची वैधता याबाबत प्रशासनाकडून सखोल तपास सुरू आहे. तपासाअंती कायदेशीर तरतुदींनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

https://www.prahaar.in/2026/11/29/nashik-police-transfer-major-reshuffle-in-the-nashik-police-force/

महिनाभरात एक कोटींचा अवैध साठा जप्त

नाशिकमध्ये अवैध उत्पादन आणि विक्रीविरोधात FDA च्या औषध विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या महिनाभरात विभागाने सुमारे एक कोटी रुपये किमतीचा अवैध साठा जप्त केला आहे. यापूर्वी टक्कल पडलेल्या ठिकाणी पुन्हा केस उगवण्याचा दावा करून विक्री करण्यात येणाऱ्या व्ही. एस. ऑइलच्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत ५६ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आता विनापरवाना परफ्यूम उत्पादनाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (औषधे) अशोक बर्डे, सहायक आयुक्त सुरेश देशमुख आणि चंद्रकांत मोर यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक विकास पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here