Home ब्रेकिंग न्यूज Nashik Accident : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात ! सिमेंट मिक्सरखाली चिरडून 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Nashik Accident : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात ! सिमेंट मिक्सरखाली चिरडून 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

0
Nashik Accident : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात ! सिमेंट मिक्सरखाली चिरडून 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

नाशिक : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, या कामांदरम्यान योग्य नियोजन आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पपया नर्सरीजवळ झालेल्या भीषण अपघातात १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला आहे. श्रुती संतोष घाटोळ असे मृत तरुणीचे नाव असून, दुचाकी घसरून ती सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमका अपघात कसा घडला ?

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही या मार्गावरून वाहतूक सुरू आहे. श्रुती घाटोळ दुचाकीवरून पपया नर्सरी परिसरातून जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या अपूर्ण साईड पट्टीमध्ये तिच्या दुचाकीचे चाक अडकले. त्यामुळे दुचाकीवरील तिचे नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावर पडली. याचवेळी मागून येणाऱ्या सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली ती आल्याने गंभीर अपघात झाला. या दुर्घटनेत श्रुतीचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे. (Nashik Accident News)

https://www.prahaar.in/2026/11/29/nashik-fda-raids-an-unlicensed-perfume-factory-in-nashik/

कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाचा आरोप; नागरिक संतप्त

या रस्त्यावरील अपूर्ण आणि धोकादायक साईड पट्ट्यांबाबत स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी यापूर्वीही आवाज उठवला होता. संबंधित ठेकेदाराला वारंवार लेखी निवेदने देऊन साईड पट्ट्या तातडीने भरून घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागरिकांना सुरक्षित प्रवास करता येणे अपेक्षित असताना, अपूर्ण रस्त्यांमुळे अपघात होत असल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एका १८ वर्षीय तरुणीला जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी आणि रस्त्यांवरील धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here