Home ब्रेकिंग न्यूज ‘काशी तमिळ संगमम ५.०’ला सुरुवात, २०७ प्रतिनिधींची पहिली तुकडी विशेष रेल्वेने वाराणसीकडे रवाना

‘काशी तमिळ संगमम ५.०’ला सुरुवात, २०७ प्रतिनिधींची पहिली तुकडी विशेष रेल्वेने वाराणसीकडे रवाना

0
‘काशी तमिळ संगमम ५.०’ला सुरुवात, २०७ प्रतिनिधींची पहिली तुकडी विशेष रेल्वेने वाराणसीकडे रवाना

चेन्नई : तमिळनाडू आणि काशी यांच्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक नाते अधिक दृढ करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘काशी तमिळ संगमम ५.०’ या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. या महोत्सवांतर्गत २०७ प्रतिनिधींची पहिली तुकडी विशेष रेल्वेने वाराणसीकडे रवाना झाली. २६ नोव्हेंबर रोजी चेन्नई एग्मोर रेल्वे स्थानकावर तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या हस्ते कन्याकुमारी-बनारस विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

यावेळी राज्यपालांच्या पत्नी, आयआयटी मद्रासचे संचालक प्रा. व्ही. कामकोटी आणि केंद्रीय शास्त्रीय तमिळ संस्थेचे संचालक डॉ. चंद्रशेखर उपस्थित होते. या विशेष रेल्वेने प्रवास करणारे प्रतिनिधी २७ नोव्हेंबर रोजी वाराणसी येथे पोहोचणार आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/29/mann-ki-baat-pm-narendra-modis-message-to-the-nation-in-the-140th-episode-of-mann-ki-baat/

राज्यपाल आर्लेकर यांनी यावेळी विद्यार्थी प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या. वाराणसीतील वास्तव्यात हे विद्यार्थी भरतनाट्यम, विल्लुपट्टू आणि कलियाट्टम यांसारख्या पारंपरिक तमिळ कलांचे सादरीकरण करणार आहेत. त्यामुळे या सांस्कृतिक महोत्सवातून तमिळ संस्कृतीची ओळख उत्तर भारतातील नागरिकांना करून दिली जाणार आहे. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण रेल्वेने कन्याकुमारी, चेन्नई आणि कोईम्बतूर येथून बनारससाठी विशेष रेल्वे गाड्यांच्या सात जोड्यांचे नियोजन केले आहे.

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने २०२२ मध्ये ‘काशी तमिळ संगमम’ या उपक्रमाची सुरुवात केली होती. यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष असून, महिनाभर विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदाच्या महोत्सवासाठी ‘चला तिरुक्कुरल शिकूया’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. तमिळनाडू आणि काशी यांच्यातील प्राचीन सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि साहित्यिक संबंध नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here