नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये आज (शुक्रवारी) राजकीय आणि प्रशासकीय दृष्ट्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी १ वाजता ‘सेवा तीर्थ’ येथे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली असून, यामध्ये विविध महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
एकीकडे सरकारची महत्त्वाची बैठक होत असताना, दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वतीने २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील पुसा (PUSA) परिसरात दोन दिवसीय राष्ट्रीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी आणि विविध राज्यांचे प्रभारी सहभागी झाले आहेत. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन दिवसांत आगामी राजकीय डावपेच, पक्ष संघटनेची ताकद वाढवणे, येणाऱ्या विधानसभा निवडणुकांची आखणी तसेच केंद्र, राज्य सरकार आणि पक्ष संघटना यांच्यात अधिक चांगला समन्वय साधणे या विषयांवर सखोल विचारमंथन केले जाणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/27/ramayan-has-overtaken-pushpa-2-now-it-needs-only-11-crore-more-to-break-the-record-of-baahubali-2/
पाच राज्यांतील निवडणुकांची तयारी आणि बूथ बळकटीकरण
भाजपच्या या राष्ट्रीय बैठकीत आगामी काळात विधानसभा निवडणुका होणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांतील सद्यस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बूथवर पक्ष अधिक मजबूत करणे, नवीन सदस्य नोंदणी वाढवणे, प्रचाराची रणनीती ठरवणे आणि तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाचा पोहोच वाढवण्यासाठी विविध योजना राबवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. नवीन कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांमधील हा दुसरा थेट संवाद असल्याने या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
संसदेचे आगामी कामकाज आणि संभाव्य विधेयके
दरम्यान, लोकसभा सचिवालयाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, १८ व्या लोकसभेच्या आठव्या सत्राचा दुसरा टप्पा ३० नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. सरकारी कामकाजाच्या गरजेनुसार हे सत्र ३ डिसेंबरपर्यंत सुरू राहू शकते. आवश्यक ते शासकीय कामकाज पार पाडण्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी लोकसभा आणि २ डिसेंबर रोजी राज्यसभा बोलवण्याची विनंती सरकारने अनुक्रमे लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींना केल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. या अधिवेशनात सरकार कोणती नेमकी विधेयके आणणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, या निर्णयामुळे आगामी काळात ‘मतदारसंघ पुनर्रचना (परिसीमन) विधेयक’ आणि ‘महिला आरक्षण विधेयक’ मांडले जाईल का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार तर्कवितर्क लढवले जात आहेत. संसदेचे यापूर्वीचे पावसाळी अधिवेशन २०२६ मध्ये पार पडले होते, जे १३ ऑगस्ट रोजी दोन्ही सभागृहे अनिश्चित काळासाठी तहकूब होऊन संपले होते. प्रस्तावित परिसीमन विधेयकाचा मुख्य हेतू लोकसभेतील एकूण जागांची संख्या वाढवून ८५० पर्यंत नेण्याचा असल्याचे सांगितले जात आहे.