नवी मुंबई: नवी मुंबईमधील जुईनगर एमआयडीसी परिसरामध्ये एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे. सोन्याची वाहतूक करणाऱ्या व्हॅनवर अज्ञात चार जणांच्या टोळीने धाडसी दरोडा टाकून तब्बल 16 किलोहून अधिक सोनं लुटून नेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी प्राथमिक माहिती माध्यमांना दिली आहे. सध्याच्या बाजारभावानुसार चोरी करण्यात आलेल्या सोन्याची किंमत जवळपास 20 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. रात्रीच्या भयानक शांततेत भर रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शिवाय, नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
https://www.prahaar.in/2026/11/27/asked-someone-not-to-smoke-and-got-attacked-with-a-knife-a-shocking-incident-at-thakurli-station/
मिळालेल्या माहितीनुसार, जुईनगर एमआयडीसी परिसरातील सर्व्हिस रोडवरून सोन्याची वाहतूक करणारी व्हॅन जात असताना रात्रीच्या सुमारास हा हल्ला झाला. चार जणांच्या टोळीने वॅगनआर कारमधून येत व्हॅनचा मार्ग अडवला. त्यानंतर टोळीतील हल्लेखोरांनी व्हॅनमधील कर्मचाऱ्यांना अडवून मारहाण केली आणि त्यांच्या ताब्यातील सोन्याचा मोठा ऐवज लुटून घटनास्थळावरून पळ काढला. काही क्षणांतच घडलेल्या या थरारक प्रकारामुळे कर्मचाऱ्यांना सावरण्याचीही संधी मिळाली नाही आणि चोरट्यांनी ऐवजासह पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
https://www.prahaar.in/2026/11/27/assault-on-young-woman-in-the-sonegaon-forest-area-nagpur-her-boyfriend-beaten-and-threats-issued-via-video/
प्राथमिक अंदाजानुसार लुटण्यात आलेल्या सोन्याचे वजन 16 किलोपेक्षा जास्त असून, त्याची किंमत सुमारे 20 कोटी रुपये इतकी आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. मात्र, हे सोने नेमके कोणाचे होते, ते कुठून आणले जात होते आणि या व्हॅनमधून कोणत्याही प्रकारची तस्करी सुरू होती का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या दरोड्याची पद्धत आणि वेळेचे अचूक नियोजन पाहता, दरोडेखोरांना या व्हॅनमधून सोने नेले जात असल्याची माहिती आधीच मिळाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. तसेच या वाहनाचा नेमका मार्ग आणि हालचालींची माहिती आरोपींना ठाऊक असावी आणि त्यानुसारच त्यांनी संपूर्ण कट रचून हा दरोडा टाकला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण घटनेत दरोडेखोरांना आतूनच कोणी टीप दिली होती का, या दृष्टिकोनातूनही पोलीस सखोल तपास करत आहेत. तपासातील पुढील धागेदोरे लवकरच हाती लागण्याची शक्यता आहे.