तब्बल सात वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर जेट एअरवेजच्या माजी कर्मचाऱ्यांना मोठा विजय मिळाला आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाने (NCLAT) पात्र माजी कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि भविष्य निर्वाह निधीची (PF) थकित रक्कम व्याजासह पुढील दोन आठवड्यांत देण्याचं महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना एकूण सुमारे ४८० कोटी रुपयांची थकबाकी मिळणार आहे.
एप्रिल २०१९ मध्ये आर्थिक संकटामुळे जेट एअरवेजची विमानसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर कंपनी दिवाळखोरी प्रक्रियेत गेली आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कंपनीच्या लिक्विडेशनचे आदेश दिले होते. या संपूर्ण काळात हजारो कर्मचाऱ्यांचे वेतन, ग्रॅच्युइटी आणि पीएफचे पैसे अडकून पडले होते. कर्मचारी संघटनांनी आपल्या हक्काच्या पैशांसाठी सातत्याने कायदेशीर लढा दिला.
https://www.prahaar.in/2026/11/26/sbi-clerk-main-exam-2026-begins-recruitment-process-for-9766-posts-get-all-the-details-here/
ग्रॅच्युइटी आणि पीएफ ही वैधानिक देणी असून ती सामान्य लिक्विडेशन मालमत्तेचा भाग मानली जाऊ शकत नाहीत, असे न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यानुसार, राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाने आता लिक्विडेटरला ही रक्कम तातडीने वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशानुसार, पात्र कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटीची रक्कम व्याजासह थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, तर पीएफची रक्कम पीएफ कार्यालयामार्फत संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाईल. भारतीय नियमांनुसार किमान पाच वर्षे सेवा पूर्ण केलेले कर्मचारी ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतात. या निर्णयामुळे वर्षानुवर्षे प्रतीक्षेत असलेल्या जेट एअरवेजच्या माजी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.