उत्तर प्रदेश : आई-वडिलांचे आपल्या मुलांवरील प्रेम अनेकदा अनोख्या कृतीतून व्यक्त होते. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील एका 80 वर्षीय व्यक्तीने आपल्या एकुलत्या एका मुलीवर भविष्यात अंत्यविधींच्या जबाबदाऱ्या पडू नयेत, यासाठी स्वतःच तेरावीचा विधी आयोजित केला. बलजोर सिंह यांच्या या निर्णयाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. त्यांनी या कार्यक्रमासाठी तब्बल 900 हून अधिक नातेवाईक आणि गावकऱ्यांना आमंत्रित केले होते.
https://www.prahaar.in/2026/11/23/liquor-hidden-under-cement-veranda-illegal-liquor-stock-seized-in-jhansi-pumped-out-by-hand-pump/
मुलीवरील जबाबदारी कमी करण्यासाठी घेतला निर्णय
ही घटना 15 नोव्हेंबर 2026 रोजी उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बारौत परिसरातील जोहरी गावात घडली. बलजोर सिंह यांना पिंकी नावाची एकुलती एक मुलगी आहे. तिचे लग्न झाले असून तिला मुलेही आहेत. आपल्या निधनानंतर अंत्यविधी आणि त्यासंबंधीच्या सामाजिक जबाबदाऱ्यांचा आर्थिक व मानसिक भार मुलीवर पडू नये, अशी त्यांची इच्छा होती.
याच विचारातून त्यांनी जिवंतपणीच स्वतःची तेरावी आयोजित करण्याचा निर्णय घेतला. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, मुलगा नसल्यामुळे आपल्या मुलीवर या जबाबदाऱ्यांचे ओझे पडू नये, म्हणून आपण हा विधी स्वतःच करत असल्याचे त्यांनी सांगितले.
900 पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था
या अनोख्या कार्यक्रमासाठी सुमारे 900 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. जेवण तयार करण्यासाठी आठ स्वयंपाकी नेमण्यात आले होते. पाहुण्यांसाठी पुरी, भाजी आणि मिठाई अशा पदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमात पारंपरिक हवनही करण्यात आले. नातेवाईक, ग्रामस्थ आणि परिसरातील अनेक नागरिक या सोहळ्यात सहभागी झाले. उत्तर प्रदेशचे मंत्री के. पी. सिंह यांनीही उपस्थित राहून बलजोर सिंह यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
नातवाच्या डोक्यावर बांधली पगडी
या कार्यक्रमातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे पारंपरिक पगडी समारंभ. उत्तर भारतातील काही समुदायांमध्ये कुटुंबप्रमुखाच्या निधनानंतर पगडी बांधण्याचा विधी केला जातो. यामधून कुटुंबाची जबाबदारी पुढील पिढीकडे सोपवण्याचे प्रतीक मानले जाते.
बलजोर सिंह यांनी हा विधी स्वतःच करत आपला नातू मुकुल याच्या डोक्यावर पगडी बांधली. अशा प्रकारे त्यांनी कुटुंबाची जबाबदारी पुढील पिढीकडे प्रतीकात्मकरीत्या सोपवली. त्यांच्या मुलगी पिंकीनेही या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. वडिलांचे आरोग्य चांगले राहावे आणि त्यांनी कुटुंबाला असेच मार्गदर्शन करत राहावे, अशी इच्छा तिने व्यक्त केली.
काय असते तेरावी?
हिंदू परंपरेनुसार, एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर तेराव्या दिवशी तेरावीचा विधी केला जातो. या दिवशी कुटुंबीय आणि नातेवाईक एकत्र येऊन धार्मिक विधी, प्रार्थना आणि भोजनाचे आयोजन करतात. मात्र, बलजोर सिंह यांनी हा पारंपरिक विधी जिवंतपणीच आयोजित करून वेगळा आदर्श मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
मुलीच्या भविष्याची काळजी आणि तिच्यावरील जबाबदाऱ्यांचा विचार करून घेतलेल्या या निर्णयामुळे बलजोर सिंह यांची कहाणी चर्चेचा विषय ठरली आहे.