भंडारा : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशय आणि मामा तलाव परिसरातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मत्स्य प्रक्रिया, पॅकेजिंग आणि निर्यात सुविधांचा समावेश असलेला सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. यासाठी संबंधित विभागांच्या समन्वयाने 1 ते 2 महिन्यांत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यासंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार नरेंद्र भोंडेकर, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, भंडारा जिल्हाधिकारी ऑनलाइन पद्धतीने आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
11 सहकारी संस्थांना सहभागी करून प्रकल्प उभारणार
गोसीखुर्द जलाशय क्षेत्रात गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसायाची मोठी क्षमता आहे. सध्या या परिसरात 11 सहकारी संस्था कार्यरत आहेत. मात्र, मोठ्या प्रकल्पासाठी आवश्यक भांडवल आणि तांत्रिक कौशल्य उपलब्ध व्हावे, यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीचे प्रारूप तयार करण्याची सूचना मंत्री राणे यांनी केली.
या प्रकल्पात सहकारी संस्थांना महत्त्वाचे स्थान देऊन तांत्रिक आणि व्यावसायिक भागीदारांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांचे हक्क अबाधित ठेवून प्रकल्पासाठी आवश्यक गुंतवणूक आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळू शकणार आहे.
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरण आणि मामा तलावांमध्ये मत्स्यपालनाला चालना देऊन स्थानिक मच्छीमारांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली.
भंडारा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्यातील तलावांमधील मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत गोसेखुर्द धरण आणि मामा तलावातील मत्स्यव्यवसायाच्या सर्वांगीण विकासासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस आमदार श्री. नरेंद्र भोंडेकर, मत्स्यव्यवसाय आयुक्त श्री. भानुदास पालवे, भंडारा जिल्हाधिकारी (ऑनलाइन) तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @fisheriesgom
— Nitesh Rane (@NiteshNRane) November 25, 2026
प्रक्रिया, पॅकेजिंग आणि निर्यात सुविधांवर भर
प्रकल्प अहवालात आवश्यक जागा, निधी, मत्स्य प्रक्रिया आणि पॅकेजिंग केंद्र, निर्यात व्यवस्था तसेच विविध विभागांच्या परवानग्यांचा समावेश असेल. या प्रकल्पातून मत्स्योत्पादन वाढवणे, अनधिकृत मासेमारीला आळा घालणे आणि शासनाचा महसूल वाढवणे हे उद्दिष्ट आहे. भविष्यात या प्रकल्पामुळे सुमारे 10 हजार लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
मत्स्य बाजारासाठी 5 कोटींपर्यंत निधी
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत मत्स्य बाजार उभारण्यासाठी 5 कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले. परिसरातील तलावांची संख्या आणि मत्स्यव्यवसायाची क्षमता लक्षात घेऊन आधुनिक मत्स्य बाजार उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अशा बाजारांमुळे मच्छीमारांना विक्रीसाठी सुविधा मिळण्यासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळू शकते.
मच्छीमारांना मत्स्यखाद्य उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव
मत्स्यव्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे काही लाभ मच्छीमारांनाही मिळणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. पुढील वर्षासाठी मत्स्यखाद्य उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावही उपसमितीने मांडला आहे. मागील आणि चालू वर्षात मत्स्यखाद्य खराब झाल्याच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना मदत करण्यासाठी पॅकेजमध्ये त्याचा समावेश करण्याबाबत चर्चा झाली.
याशिवाय तलावांमधील गाळ काढणे आणि खोलीकरणाची कामे स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात हाती घेण्याची सूचनाही नितेश राणे यांनी केली.