नागपूर: नागपूर शहरामध्ये करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या चोरीचा पर्दाफाश मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यामध्ये करण्यात आला आहे. घडलेल्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा नागपूर शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. व्यापारी सुरेश परमार यांच्या कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला करून तब्बल 3.74 कोटी रुपये लुटल्याच्या आरोपाखाली नागपूर पोलिसांनी मध्यप्रदेशातून दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या रकमेपैकी 3 कोटी 28 लाख रुपयांची रोकड एका शेतातून जप्त करण्यात आली आहे. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी आरोपींनी ही मोठी रक्कम डोरली माल गावातील एका शेतात भूशाच्या ढिगाऱ्याखाली तीन गोण्यांमध्ये लपवून ठेवली होती. या कारवाईमुळे लुटीच्या थरारक कटातील अनेक धागेदोरे हाती लागले आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/24/constitution-day-cleanliness-drive-at-11-forts-in-maharashtra-gadancha-maan-sanvidhanacha-sanman-at-raigad/
ही घटना 18 नोव्हेंबर रोजी सकाळी नागपूरच्या शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळसीनगर परिसरात घडली. धान आणि फायनान्सचा व्यवसाय करणारे व्यापारी सुरेश परमार यांच्या कर्मचार्यांना लक्ष्य करत आरोपींनी चाकूने हल्ला केला आणि रोख रकमेने भरलेली एसयूव्ही कार घेऊन चोरटे पसार झाले. संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते, ज्यामुळे या गुन्ह्याचे गांभीर्य अधिकच वाढले. तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी ही लुटमार अचानक केलेली नसून त्यामगे पूर्वनियोजित कट होता. हल्ल्यापूर्वी आरोपींनी व्यापाऱ्याचे घर, दैनंदिन हालचाली आणि येण्या- जाण्याच्या वेळांची बारकाईने माहिती गोळा केली होती. शुभम डहरवाल, अजय यादव आणि रितेश मरस्कोल्हे यांनी झूमकार अॅपच्या माध्यमातून वाहन बुक केले आणि त्याच गाडीचा वापर व्यापाऱ्याच्या घराची रेकी करण्यासाठी केला. योग्य संधी साधून त्यांनी व्यापारी सुरेश परमारच्या कर्मचार्यांवर डल्ला मारला.
https://www.prahaar.in/2026/11/24/entrepreneur-in-every-village-scheme-to-be-launched-from-dharashiv-financial-assistance-of-up-to-%e2%82%b91-crore-for-new-entrepreneurs/
पैशांची चोरी केल्यानंतर आरोपी नागपूरवरून थेट मध्य प्रदेशातील बालाघाट येथे पसार झाले. गुन्ह्यात वापरलेली कार बालाघाट रेल्वे स्थानकावर उभी करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर लुटलेली रोकड तीन गोण्यांमध्ये भरून डोरली माल गावातील दिनेश डहरवाल यांच्या शेतात भूशाखाली लपवण्यात आली होती. नागपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत बालाघाटपर्यंत माग काढला आणि शेतात शोधमोहीम राबवून 3 कोटी 28 लाख रुपयांची रोख रक्कम आपल्या ताब्यात घेतली. या प्रकरणात चंद्रकांत बघेल आणि रजनीकांत चंद्रभान यांना अटक करण्यात आली असून, एकूण आठ आरोपींचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे. शुभम डहरवाल, अजय यादव, विशाल सोनगडे आणि रितेश मरस्कोल्हेसह आणखीन उर्वरित सहा आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच गिट्टीखदान परिसरातील जगदीशनगर येथील जुनघरे आणि अन्य एका व्यक्तीच्या संभाव्य भूमिकेचीही तपासणी सुरू असून, तपास केल्यानंतरच त्याबद्दलची माहिती समोर येईल.
https://www.prahaar.in/2026/11/24/manufacturing-licenses-of-pune-based-inducare-pharmaceutical-cancelled-again-discovery-reveals-production-of-9-drugs-without-authorization/
नागपूर पोलिसांनी आतापर्यंत 3 कोटी 74 लाख रूपयांपैकी 3 कोटी 28 लाख रुपये जप्त करण्यात आले असले, तरी उर्वरित 46 लाख रुपयांचा हिशोब अद्याप बाकी आहे. ही रक्कम इतरत्र लपवली आहे की खर्च केली गेली, याचा तपास पोलीस करत आहेत. फरार आरोपींच्या अटकेनंतर या संपूर्ण कटामागील सूत्रधार आणि आर्थिक व्यवहारांचे मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.