Home ब्रेकिंग न्यूज ‘आदि अनंत’ मधून आजोबा-नातवाच्या नात्याची हळवी गोष्ट; इफ्फीमध्ये झाली चर्चा

‘आदि अनंत’ मधून आजोबा-नातवाच्या नात्याची हळवी गोष्ट; इफ्फीमध्ये झाली चर्चा

0
‘आदि अनंत’ मधून आजोबा-नातवाच्या नात्याची हळवी गोष्ट; इफ्फीमध्ये झाली चर्चा

गोव्यात सुरू असलेल्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरमा विभागात प्रदर्शित झालेल्या ‘आदि अनंत’ या मराठी चित्रपटाबाबत निर्माते-दिग्दर्शक महेश लिमये यांनी आपला सर्जनात्मक प्रवास उलगडला. पत्रसूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुमारे १३७ मिनिटांचा हा चित्रपट स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणारा तरुण अभिनेता आदित्य आणि त्याचे उत्साही आजोबा अनंत राव यांच्यातील नात्याचा मागोवा घेतो. आदित्यची भूमिका अभिनेता-लेखक संकर्षण कऱ्हाडे याने साकारली असून अनंत राव यांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आहेत. नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या अशोक सराफ यांचा या चित्रपटातील अभिनय विशेष लक्षवेधी ठरत आहे.

दोन्ही पात्रे आर्थिक आणि वैयक्तिक आव्हानांना तोंड देत असतात. तरीही प्रेम, हलकेफुलके विनोद आणि एकमेकांना दिलेल्या पाठिंब्याच्या माध्यमातून त्यांची गोष्ट फुलत जाते, असे लिमये यांनी सांगितले. एका अपघातामुळे अनंत राव यांना अंथरुणावर खिळावे लागते. त्यामुळे आदित्यला आजोबांची सेवा-सुश्रुषा आणि स्वतःच्या अभिनयाच्या आकांक्षा यामध्ये समतोल साधावा लागतो. यातून त्यांच्या नात्यात एक अवघड वळण येते. दबाव आणि वैफल्यामुळे त्यांचे नाते ताणले जात असतानाच हा चित्रपट कौटुंबिक जबाबदाऱ्या, अनेकदा दुर्लक्षित राहणारे सुश्रुषाविषयक वास्तव आणि आजच्या जीवनात यशाचा खरा अर्थ काय, याचा शोध घेतो, असे लिमये म्हणाले.

https://www.prahaar.in/2026/11/24/bomb-threat-issued-against-diljit-dosanjhs-bengaluru-concert-warning-also-includes-threats-to-target-metro-stations/

संकर्षण कऱ्हाडे यांनी पहिल्यांदा ही कथा ऐकवली तेव्हा आपण खूप भावूक झालो होतो, अशी आठवण लिमये यांनी सांगितली. कारण या कथेने आपल्या वडिलांच्या अखेरच्या दिवसांमध्ये त्यांची काळजी घेतानाच्या आठवणी पुन्हा जागवल्या. चित्रपटाची मुळे मराठी कथाकथनात रुजलेली असली तरी त्याचा भावनिक गाभा भाषेच्या सीमा ओलांडून भारतभरातील आणि परदेशातील कुटुंबांपर्यंत पोहोचतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलताना लिमये यांनी सांगितले की, यात प्रख्यात शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी गायलेले एक भक्तीपर भजन आहे. यामध्ये अशोक सराफ तबला वाजवताना पडद्यावर दिसतात. अनुभवी कलाकार असूनही सराफ यांनी या पात्राकडे एखाद्या नवख्या कलाकारासारखे मोकळ्या मनाने पाहिले. सराफ आणि कऱ्हाडे यांच्यातील परस्पर आदरामुळे त्यांच्या पडद्यावरील नात्याला सहज लय लाभली.

‘आदि’ म्हणजे सुरुवात आणि ‘अनंत’ म्हणजे कालातीतता, या दोन शब्दांमधील विरोधाभासातून वेगवेगळ्या पिढ्यांमधील नात्यांचा शोध या शीर्षकातून मांडला आहे. मुंबईच्या जे.जे. कला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले महेश लिमये हे छायाचित्रणकार आणि दिग्दर्शक आहेत. त्यांच्या ‘यलो’ या पहिल्या चित्रपटाने तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले, तर ‘जग्गू आणि ज्युलियेट’ ला महाराष्ट्र शासनाचा चित्रपट पुरस्कार मिळाला. ‘आदि अनंत’ हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा तिसरा चित्रपट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here