Home ब्रेकिंग न्यूज Political News: डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग’ पुस्तकाचा चौथा खंड प्रकाशित

Political News: डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग’ पुस्तकाचा चौथा खंड प्रकाशित

0
Political News: डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग’ पुस्तकाचा चौथा खंड प्रकाशित

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या माजी उपसभापती आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग’ या पुस्तकाच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन सोमवारी मुंबईत करण्यात आले. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवनातील जलभूषण सभागृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मैत्री पब्लिकेशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या खंडात 2014 ते 2020 या सहा वर्षांच्या काळात डॉ. गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत मांडलेले प्रश्न, त्यावर सरकारने दिलेली उत्तरे आणि त्यानंतर केलेला पाठपुरावा यांची माहिती संकलित करण्यात आली आहे.

पाच वेळा विधानपरिषदेवर निवड होणे महिला सक्षमीकरणाचा टप्पा

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी डॉ. गोऱ्हे यांच्या विधानपरिषदेतील पाच कार्यकाळांचा उल्लेख केला. त्यांची ही वाटचाल महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधारी आणि विरोधी बाकांवर तसेच उपसभापती म्हणून पीठासीन आसनावरून त्यांनी सभागृहाचे काम पाहिले आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजाचे विविध पैलू त्या पुस्तकातून मांडू शकतात, असे राज्यपाल म्हणाले. अन्यायग्रस्त महिला आणि बालकांच्या मदतीसाठी त्यांनी केलेल्या कामाचाही त्यांनी गौरव केला.

https://www.prahaar.in/2026/11/23/suspicion-of-drug-use-at-a-concert-at-mahalaxmi-racecourse-strict-action-taken-by-mumbai-police/

लोकांचे प्रश्न ऐकून न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. गोऱ्हे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. एखादा प्रश्न सभागृहात कसा मांडला, सरकारने त्यावर काय उत्तर दिले आणि त्यानंतर प्रत्यक्षात काय घडले, याची माहिती या पुस्तकातून मिळते. त्यामुळे हा खंड सामाजिक संदर्भग्रंथ म्हणून महत्त्वाचा ठरतो, असे ते म्हणाले.

पीडित महिलांचे म्हणणे ऐकून घेणे, पोलीस आणि प्रशासनाशी संपर्क साधणे तसेच त्यांना वैद्यकीय मदत, समुपदेशन आणि कायदेशीर आधार मिळतो की नाही, याचा पाठपुरावा करण्याच्या त्यांच्या कामाचाही शिंदे यांनी उल्लेख केला. ऊसतोड महिला कामगारांचे आरोग्य आणि पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्यांशी संबंधित कार्यातील त्यांच्या योगदानाचा त्यांनी गौरव केला.

सभागृहातील विधायक कामाची नोंद पुस्तकात

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी डॉ. गोऱ्हे यांच्या विधिमंडळातील अभ्यासपूर्ण कामाचा उल्लेख केला. सभागृहात एखादा मुद्दा मांडताना त्या संबंधित नियमांचा आधार घेत असत. उपसभापती म्हणूनही त्यांनी ही शिस्त कायम ठेवली, असे नार्वेकर म्हणाले.

सभागृहातील गोंधळाच्या बातम्या प्रसिद्ध होतात; मात्र एखाद्या प्रश्नासाठी सदस्याने केलेली तयारी आणि घेतलेले परिश्रम अनेकदा लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. या पुस्तकातून अशा विधायक कामाची नोंद घेतली गेली आहे, असे त्यांनी सांगितले.

आमदारांचे काम जनतेपर्यंत पोहोचावे हा उद्देश

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुस्तकामागील भूमिका स्पष्ट केली. आमदार सभागृहात नेमके काय काम करतात, हे नागरिकांना समजावे आणि त्यांना कामाचा प्रत्यक्ष संदर्भ मिळावा, या उद्देशाने हा खंड तयार केल्याचे त्यांनी सांगितले.

या पुस्तकात महिला व बालकांची सुरक्षितता, शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न, आरोग्य, पर्यावरण, पुणे परिसरातील स्थानिक प्रश्न तसेच विधेयके, अर्थसंकल्प आणि पुरवणी मागण्यांवरील कामाचा समावेश आहे. या खंडाच्या तयारीसाठी प्रकाशिका मोहिनी कारंडे, विशेष कार्य अधिकारी योगेश जाधव आणि कार्यालयातील सहकाऱ्यांनी सुमारे अडीच वर्षे काम केल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री योगेश कदम, विधानपरिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे आणि प्रकाशिका मोहिनी कारंडे उपस्थित होते. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here