Home क्रीडा पहिल्या कसोटी सामन्यातून मोहम्मद सिराजला वगळल्याने क्रीडाप्रेमींचा संताप, अखेर कर्णधार शुभमन गिलने मौन सोडलं

पहिल्या कसोटी सामन्यातून मोहम्मद सिराजला वगळल्याने क्रीडाप्रेमींचा संताप, अखेर कर्णधार शुभमन गिलने मौन सोडलं

0
पहिल्या कसोटी सामन्यातून मोहम्मद सिराजला वगळल्याने क्रीडाप्रेमींचा संताप, अखेर कर्णधार शुभमन गिलने मौन सोडलं
पहिल्या कसोटी सामन्यातून मोहम्मद सिराजला वगळल्याने क्रीडाप्रेमींचा संताप, अखेर कर्णधार शुभमन गिलने मौन सोडलं (Photo: ANI)

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील प्लेइंग 11 मधून मोहम्मद सिराजला वगळण्याचा निर्णय घेतला. त्याच्या ऐवजी आकाश दीप, अंशुल कंबोज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी जसप्रीत बुमराहला गोलंदाजीत साथ दिली. बेसिन रिझर्व्ह येथे पाचव्या आणि अंतिम दिवशी भारताला न्यूझीलंडच्या उर्वरित पाच विकेट्स घेण्यात अपयश आले आणि सामना अनिर्णित राहिला.हा सामना ड्रॉ झाल्याने प्लेइंग 11 मध्ये सिराज हवा होता, अशी चर्चा रंगली आहे. पण त्याला प्लेइंग 11 मधून का डावललं? याबाबत मोहम्मद सिराजने स्पष्टीकरण दिलं आहे. कर्णधार शुभमन गिलने सांगितलं की, संघाची निवड क्रिकेटपटूंच्या सध्याच्या फॉर्मवर आधारित होती. इतकंच काय तर त्याला डावलण्याचा निर्णय कठीण होता. त्यामुळे वगळण्यापूर्वी त्याच्याशी वैयक्तिक चर्चा झाली होती. सिराजलाही हा निर्णय समजला होता.

काय म्हणाला कर्णधार शुभमन गिल?

कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, “सिराज माझा खूप चांगला मित्र आहे आणि त्याला संघातून वगळणे हा एक खूप कठीण निर्णय होता. आम्ही एकत्र खूप क्रिकेट खेळलो आहोत आणि मी त्याला आमच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ओळखतो. मी कसोटी सामन्यापूर्वी त्याच्याशी बोललो आणि संघाचा निर्णय त्याला समजावून सांगितला, आणि तो समजून गेला. बघा, प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत एक वेळ अशी येते जेव्हा तो सर्वोत्तम कामगिरी करत नसतो. आम्ही संघाची निवड त्यांच्या सध्याच्या फॉर्मच्या आधारावर केली आहे. सिराज ज्या प्रकारचा खेळाडू आहे, तो आणखी चांगल्या फॉर्ममध्ये पुनरागमन करेल.”

कसोटी सामन्यात काय घडलं?

नाणेफेकीचा कौल गमावल्याने न्यूझीलंडच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. खरं तर 70 धावांवर न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत होता. मात्र हेनरी निकोल्सने नाबाद 175 आणि ग्लेन फिलिप्सने 118 धावा केल्या. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 213 धावांची भागीदारी करून संघाला बिकट परिस्थितीतून बाहेर काढले. न्यूझीलंडने पहिल्या डावात 368 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने आपला पहिला डाव 9 गडी बाद 720 धावांवर घोषित केला होता. तसेच भारताकडे 352 धावांची मजबूत आघाडी होती. केएल राहुलने 136 आणि ऋषभ पंतने 128 धावा केल्या. गिलचे शतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. यशस्वी जयस्वालने 85, तर देवदत्त पडिक्कलने 80 आणि ध्रुव जुरेलने 78 धावांचे योगदान दिले. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने कडवी झुंज दिली आणि 5 बाद 239 धावा केल्या. त्यामुळे हा सामना ड्रॉ झाला.

https://www.prahaar.in/2026/11/23/here-is-how-team-india-can-reach-the-world-test-championship-final-understand-the-calculations/

मालिकेतील अंतिम कसोटी सामना क्राईस्टचर्च येथे होणार आहे. हा कसोटी सामना 27 नोव्हेंबर रोजी हॅगली ओव्हलवर सुरू होईल. पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर, भारत दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल. यापूर्वी, भारताने न्यूझीलंड दौऱ्यावर पाच सामन्यांची टी20 आंतरराष्ट्रीय मालिका 3-2 आणि एकदिवसीय मालिका 3-1 ने जिंकली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here