Home ताज्या घडामोडी Narendra Modi: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारत दौऱ्यावर; मोदी आणि मुर्मू यांना देणार खास मूर्तिभेट

Narendra Modi: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारत दौऱ्यावर; मोदी आणि मुर्मू यांना देणार खास मूर्तिभेट

0
Narendra Modi: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारत दौऱ्यावर; मोदी आणि मुर्मू यांना देणार खास मूर्तिभेट
Photo: ANI

Narendra Modi: नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर निघाले आहेत. भारत दौऱ्यात नेपाळी पंतप्रधान बालेंद्र शाह हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. भारत-नेपाळ संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि प्रादेशिक व जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यासाठी पंतप्रधान मोदींशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांनी बालेंद्र शाह यांच्या आगमनानंतर त्यांचे स्वागत केलं. नेपाळच्या पंतप्रधान पदाची धुरा मार्च 2026 मध्ये स्वीकारल्यानंतर शाह यांचा हा पहिलाच भारत दौरा असून पंतप्रधान म्हणूनही त्यांचा पहिलाच परदेश दौरा आहे. त्यांच्या या दौऱ्यावरून काठमांडू नवी दिल्लीसोबतच्या संबंधांना किती महत्त्व देते हे दिसून येतं आहे. नेपाळचे अर्थमंत्री स्वर्णिम वागळे, परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल, पंतप्रधानांचे मुख्य सल्लागार कुमार ब्यंजनकर आणि इतर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसह शाह आज सकाळी दिल्लीसाठी रवाना झाले होते.

बालेन शाह हे पीएम मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांना नेपाळच्या समृद्ध इतिहास आणि संस्कृतीशी जोडलेल्या दोन अत्यंत खास मूर्तिभेट देणार आहेत. या भेटीदरम्यान बालेन शाह देणार असलेल्या दोन्ही भेटवस्तू भारत आणि नेपाळमधील प्राचीन सांस्कृतिक नात्याची साक्ष देणाऱ्या आहेत. बालेन शाह हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रातो मच्छिंद्रनाथ यांची मूर्ती भेट म्हणून देणार आहेत. नेपाळच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीशी हे दैवत अत्यंत खोलवर जोडलेले आहे. तसेच काठमांडू खोऱ्यात त्याची प्रमुख देवता म्हणून पूजा केली जाते. पारंपरिक मान्यतेनुसार, लिच्छवी राजवंशाचे राजा नरेंद्र देव यांनी रातो मच्छिंद्रनाथ यांना सध्याच्या आसाममधून काठमांडू खोऱ्यात आणले होते.

https://www.prahaar.in/2026/11/22/marriage-between-cousins-will-the-practice-of-marrying-ones-maternal-uncles-daughter-come-to-an-end-discussion-sparked-by-a-petition-in-the-supreme-court/

तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काठमांडूच्या चाबाहिल येथील चारुमती विहार मठाशी संबंधित एक विशेष मूर्ती भेट दिली जाणार आहे. या विहाराचा इतिहास थेट मौर्य सम्राट अशोक आणि त्यांची कन्या चारुमती यांच्याशी जोडलेला आहे. सम्राट अशोक आपल्या मुलीसोबत काठमांडू खोऱ्यात आले होते. पुढे चारुमती यांनी तेथील स्थानिक राजपुत्र देवपाल यांच्याशी विवाह केला आणि देवपाटन परिसरात या विहाराची स्थापना केली, अशी ऐतिहासिक मान्यता आहे. ती भाटवस्तू स्वरूपात मुर्मू यांना देण्यात येणार आहे.

बालेंद्र शाह यांच्या या दौऱ्यामुळे दोन्ही शेजारी देशांमधील विविध क्षेत्रांमधील सहकार्य आणखी दृढ करण्याची संधी मिळेल. दौऱ्याची माहिती देताना नेपाळचे परराष्ट्र सचिव अमृत बहादूर राई यांनी यासंदर्भात शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली होती. “दोन्ही पंतप्रधान सोमवारी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील, ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश असणार आहे आणि त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येईल. पंतप्रधान मोदी आपल्या नेपाळी समकक्षी आणि त्यांच्या ३४ सदस्यीय सरकारी शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ एका अधिकृत जेवणाचे आयोजनही करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान कनेक्टिव्हिटी आणि ऊर्जा सहकार्य क्षेत्रातील अनेक पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि आगामी प्रकल्पांची पायाभरणी केली जाण्याची अपेक्षा आहे. विशेषतः व्यापार, वाहतूक, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विकासात आर्थिक सहकार्य बळकट करण्यावर चर्चेचे लक्ष केंद्रित असेल. तसेच शिक्षण, आरोग्य, कृषी, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन आणि मानवी संसाधन विकास या क्षेत्रांमध्ये दोन्ही देश सामंजस्य करार देखील आदान-प्रदान करणार आहेत. उच्चस्तरीय सरकारी बैठकांव्यतिरिक्त, या दौऱ्यात नेपाळ-भारत व्यवसाय मंचाचा समावेश असेल, ज्याचा उद्देश नेपाळमध्ये भारतीय गुंतवणूक आकर्षित करणे हा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here