राज्यातील अंगणवाड्यांचं चित्र आता बदलणार आहे. अंगणवाडी केंद्रात मिळणाऱ्या सेवांमध्ये आधुनिक शैक्षणिक साहित्य आणि पायाभूत सुविधांची भर घालत ३,८३२ अंगणवाड्यांना ‘स्मार्ट अंगणवाडी’ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.अंगणवाडी केंद्रांमधून ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण, आरोग्य आणि पूर्वप्राथमिक शिक्षण दिलं जातं. तसेच गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना पोषण व आरोग्याशी संबंधित सेवा दिल्या जातात. ही केंद्रं अधिक आकर्षक, सुरक्षित आणि आनंददायी व्हावीत, यासाठी स्मार्ट अंगणवाडी संकल्पना राबवली जात आहे. शासकीय जागेत असलेल्या आणि जिथे वीज जोडणी उपलब्ध आहे, अशा केंद्रांचा यामध्ये विचार करण्यात आला आहे. अशा ३,८३२ केंद्रांना स्मार्ट करण्यासाठी मान्यता मिळाली आहे.
स्मार्ट किटमध्ये काय-काय मिळणार?
या योजनेअंतर्गत अंगणवाड्यांना स्मार्ट किट दिलं जाणार आहे. यामध्ये ई-लर्निंगसाठी लागणारं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असणार आहे. त्यामुळे लहान मुलांना खेळातून, गाणी, गोष्टी आणि चित्रांमधून शिकणं अधिक सोपं होणार आहे. याशिवाय स्वच्छ भारत किट, वॉटर प्युरिफायर, हात धुण्यासाठी बेसिनची सुविधा दिली जाणार आहे. अंगणवाडी इमारतीला रंगरंगोटी केली जाणार आहे. इमारतीची आवश्यक किरकोळ दुरुस्ती, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि स्वयंपाकघराचं आधुनिकीकरणही यामध्ये समाविष्ट आहे.
https://www.prahaar.in/2026/11/22/breakup-after-an-8-year-relationship-an-enraged-boyfriend-set-fire-outside-his-girlfriends-house-her-parents-were-inside-too-and/
टप्प्याटप्प्याने काम
अंगणवाडी केंद्रातील सुविधा आधुनिक आणि सक्षम करण्यासाठी टप्प्याटप्प्याने स्मार्ट अंगणवाड्यांची निर्मिती केली जात आहे. मुलांच्या पोषण, आरोग्य आणि सुरुवातीच्या शिक्षणासाठी अधिक गुणवत्तापूर्ण वातावरण तयार करण्याचा प्रयत्न असल्याचं मंत्री तटकरे यांनी सांगितलं. पूर्वी अंगणवाडी म्हणजे फक्त पोषण आहाराचं केंद्र असं चित्र होतं. आता मात्र ते मुलांच्या सर्वांगीण विकासाचं केंद्र बनत आहे. स्मार्ट अंगणवाडीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब कुटुंबातील मुलांनाही चांगल्या सुविधा मिळणार आहेत. शिक्षणाची गोडी लहानपणापासूनच लागावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.