पंढरपूर: कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल झालेल्या लाखो वारकऱ्यांच्या भक्तिमय वातावरणात कार्तिकी एकादशीचा सोहळा पंढरपुरात उत्साहात पार पडला. या पावन पर्वावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन शासकीय महापूजा केली. यावेळी राज्यातील शेतकरी सुखी-समृद्ध व्हावा, बळीराजावरील संकट दूर व्हावे आणि महाराष्ट्रावर सुख-समृद्धीची कृपा राहावी, असे साकडे उपमुख्यमंत्र्यांनी विठुरायाच्या चरणी घातले. त्याचवेळी पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र न राहता लाखो भाविकांना कायमस्वरूपी दर्जेदार सुविधा देणारे, आधुनिक आणि पर्यावरणपूरक तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले.
वारकरी संप्रदायासाठी श्री विठ्ठल हे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे पंढरपुरात कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन पूजा करता येणे, हे एक भाग्यच आहे. त्यामुळे या शासकीय महापूजेला नांदेड जिल्ह्यातील उचेगाव येथील शेतकरी दाम्पत्य सुधाकर आणि प्रणिता शिंदे यांना वारकरी प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला. वारकरी परंपरेचा सन्मान आणि बळीराजाच्या कष्टाला दिलेली ही मानवंदना ठरली. महापूजेनंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांना कार्तिकी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
https://www.prahaar.in/2026/11/21/affix-bmc-emblem-on-hospital-beds-operated-under-the-ppp-model-standing-committee-directs-the-contractor/
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करताना त्यांनी विठुरायाकडे बळीराजाच्या जीवनात सुख, समाधान आणि आनंद नांदावा, अशी प्रार्थना केल्याचे शिंदे यांनी सांगितले. शेतकरी हा आपला अन्नदाता असून सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संकटात वाऱ्यावर सोडणार नाही. दुष्काळग्रस्तांना अग्रिम मदत, पीक नुकसानभरपाई, विद्यार्थ्यांच्या शुल्कातील सवलत, कर्जवसुलीला स्थगिती यांसह आवश्यक त्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी माध्यमांसमोर दिली.
पुढे बोलताना, जनावरांसाठी चारा, पिण्याचे पाणी आणि अन्नधान्याची उपलब्धता याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पंढरपूरच्या विकासाबाबत बोलताना शिंदे यांनी तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना वर्षभर कायमस्वरूपी सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. दर्शनव्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य आणि पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर दिला जाईल. मात्र विकासाच्या प्रक्रियेत पर्यावरणाचे संरक्षण आणि स्थानिक नागरिकांचे हित यांची सांगड घातली जाईल, असे त्यांनी सांगितले.
तसेच, पंढरपूर कॉरिडॉरच्या विकासाबाबत महत्त्वाची भूमिका मांडताना त्यांनी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच पुढील प्रक्रिया राबवली जाईल, अशी ग्वाही दिली. याशिवाय कोणावरही अन्याय होणार नाही, प्रत्येकाला न्याय मिळेल आणि स्थानिकांच्या संमतीनेच विकासाची दिशा निश्चित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. विकास हा लोकांसाठी असतो आणि तो करताना लोकांचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे आहे, हा सरकारचा दृष्टिकोन असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
कार्तिकी यात्रेसाठी दाखल झालेल्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने दर्शनरांग, स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन केले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही पर्यावरणपूरक वारीच्या उपक्रमात महत्त्वपूर्ण सहभाग घेतला आहे. पंढरपूरची वारी स्वच्छ, निर्मळ आणि पर्यावरणपूरक व्हावी, यासाठी प्रशासन, मंदिर समिती, पोलीस यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी घटकांनी एकत्रितपणे काम केले आहे. या सर्वांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केले.
जलयुक्त शिवार, पाणी अडवा-पाणी जिरवा आणि जलतारा यांसारख्या उपक्रमांतून जलसंधारणाला चालना देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. शासन, सामाजिक संस्था आणि लोकसहभागातून पाण्याचे संवर्धन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच भक्ती, परंपरा आणि वारकरी संप्रदायाचा वारसा जपत आधुनिक सुविधांनी सजलेले पंढरपूर उभारण्याचा सरकारचा संकल्प या कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधोरेखित केला.
दर्शन मंडपाच्या कामासाठी अतिरिक्त 25 कोटी
पंढरपुर येथे दर्शन मंडप, स्काय वॉक आणि टोकन पद्धतीची दर्शन रांग व्यवस्था उभारण्याच्या कामासाठी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 129 कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र, ते काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे शिंदे यांनी पर्यटन विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त 25 कोटी रुपये देण्याची घोषणा यावेळी केली. तसेच मंदिर समिती कडून देण्यात आलेल्या निवेदनानुसार मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पद मंजुरीचा प्रश्न आणि घरांचा प्रश्न नक्की सोडवू, असे आश्वासन दिले.