नाशिक : नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंचवटीतील टकलेनगर परिसरात शुक्रवारी (दि. २०) भरदुपारी महाविद्यालयीन तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. वेदांत संतोष काळे (१८) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो पंचवटी महाविद्यालयात बारावीमध्ये शिकत होता. जुन्या नाशिकमधील झारकरी कोट परिसरात तो वास्तव्यास होता.
प्राथमिक माहितीनुसार, मुलीवरून (Girl) झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. सुमारे १० ते १२ जण दुचाकींवरून घटनास्थळी आल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी काहींनी वेदांतवर धारधार शस्त्राने सपासप वार केले. यात त्याच्या छाती व पाटीवर खोलवर जखमा झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हल्ल्यानंतर संशयितांनी घटनास्थाळाहून पळ काढला.
https://www.prahaar.in/2026/11/21/ahilyanagar-crime-lost-money-in-forex-trading-staged-a-break-in-to-cover-up-the-loss-and-then/
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांत एका युवतीसोबत उद्यानात गप्पा मारत बसला होता. त्याचवेळी १० ते १२ जण दुचाकींवरून तेथे आले. त्यातील काहींनी वेदांतवर धारदार शस्त्राने वार केले. घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या वेदांतला तातडीने जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital) नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकने शोधमोहीम राबवून पियुष लोखंडे याच्यासह अन्य एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. हल्लेखोरांपैकी एकाने आपली मोपेड घटनास्थळीच सोडून पलायन केले. त्यामुळे पोलिसांना तपासासाठी महत्त्वाचा धागा मिळण्याची शक्यता आहे. तर हल्ल्यात सहभागी असलेल्या अन्य संशयितांचा शोध सुरू असून, हत्येमागील नेमके कारण आणि पूर्ववैमनस्य होते का? याचा पोलीस तपास करीत आहेत.