Home ब्रेकिंग न्यूज Mumbai Book Festival: मुंबईत २४ नोव्हेंबरपासून पुस्तक महोत्सव; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Mumbai Book Festival: मुंबईत २४ नोव्हेंबरपासून पुस्तक महोत्सव; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

0
Mumbai Book Festival: मुंबईत २४ नोव्हेंबरपासून पुस्तक महोत्सव; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
Photo : X

मुंबई : पुस्तकप्रेमी, साहित्यिक आणि वाचकांसाठी मुंबईत येत्या २४ नोव्हेंबरपासून सहा दिवसांचा पुस्तक महोत्सव रंगणार आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत (एनबीटी) यांच्या वतीने २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरात ‘मुंबई पुस्तक महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात २०० प्रकाशकांचे ६०० हून अधिक पुस्तकांचे स्टॉल, नामवंत लेखकांशी संवाद, पुस्तक प्रकाशन सोहळे, विषयाधारित प्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी वाचकांना अनुभवता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलीना परिसरातील प्रवेशद्वार क्रमांक दोनजवळ महोत्सवाचे आयोजन होणार आहे. यासंदर्भातील घोषणा आयोजनस्थळी झालेल्या पत्रकार परिषदेत शनिवारी करण्यात आली. मुख्य आयोजक अमित साटम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पत्रकार परिषदेला महोत्सवाचे मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक आणि मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे उपस्थित होते.

महोत्सवात विविध भारतीय भाषांमधील साहित्य, कथा, कादंबऱ्या, चरित्रे, बालसाहित्य आणि अन्य विषयांवरील पुस्तकांचा संग्रह उपलब्ध असेल. सहा दिवसांत १०० हून अधिक कार्यक्रम आणि सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. साहित्यिक संवाद, लेखकांशी गप्पा, पुस्तक प्रकाशन, विषयाधारित प्रदर्शने, बालकांसाठी विशेष उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे. ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या १५० वर्षांच्या प्रवासावर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विशेष प्रदर्शनेही भरविण्यात येणार आहेत.

कोणकोण सहभागी होणार?

या महोत्सवात दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजीत सिंह संधू, आचार्य प्रशांत, पॅरालिम्पिक खेळाडू दीपा मलिक, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, गीतकार मनोज मुंतशिर, चित्रपट दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी, अभिनेत्री व लेखिका शेफाली शाह, अंतराळवीर शुभांशू शुक्ला, अरुणा ढेरे, विश्वास पाटील, शरणकुमार लिंबाळे, अश्विन सांघी, आनंद नीलकंठन, अक्षत गुप्ता, अंजुम चोप्रा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत. शशिकांत सावंत, मयूर शाह, राजीव श्रीखंडे, मेधा भास्करन, अंशुल चतुर्वेदी, एहसान वजीर, निकिता ठाकूर आणि प्रफुल्ल बिल्लौरे यांचीही उपस्थिती असेल. महोत्सवाचे मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी यांनी सांगितले की, दररोज सकाळी १० ते दुपारी दोन या वेळेत बालकांसाठी विशेष उपक्रम, दुपारी १२ ते सायंकाळी पाच या वेळेत लेखक मंच आणि सायंकाळी सात ते रात्री १० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि समाजात पुस्तक संस्कृती रुजवणे हा महोत्सवाचा उद्देश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here