Home क्राईम Ahilyanagar Crime : फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गमावले, नुकसान लपवण्यासाठी स्वतःच रचला घरफोडीचा बनाव अन्…

Ahilyanagar Crime : फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गमावले, नुकसान लपवण्यासाठी स्वतःच रचला घरफोडीचा बनाव अन्…

0
Ahilyanagar Crime : फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गमावले, नुकसान लपवण्यासाठी स्वतःच रचला घरफोडीचा बनाव अन्…

अहिल्यानगर : फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाल्यानंतर ही बाब घरच्यांपासून लपवण्यासाठी एका तरुणाने चक्क स्वतःच्या घरात चोरी झाल्याचा बनाव रचला. मात्र, नगरच्या कोतवाली पोलिसांनी या बनावट घरफोडीचा अवघ्या चार तासांत पर्दाफाश केला. विशेष म्हणजे, ज्या तरुणाने चोरीची तक्रार दाखल केली होती, त्यालाच पोलिसांनी आरोपी म्हणून अटक केली आहे. आदर्श ज्ञानदेव तनपुरे (रा. मराठानगर, केडगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. न्यायालयाने त्याला २१ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

घराचा दरवाजा तोडून १ लाख २५ हजार रुपये चोरीला गेल्याची तक्रार

आदर्श तनपुरे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, १७ नोव्हेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्याने त्याच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील १ लाख २५ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचे त्याने सांगितले. या तक्रारीवरून १८ नोव्हेंबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयास्पद हालचालींमुळे फिर्यादीच पोलिसांच्या रडारवर

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोतवाली पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक विशाल चिटणीस यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथक, फिंगरप्रिंट पथक आणि फॉरेन्सिक युनिटच्या मदतीने तपास केला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात आली.

या तपासादरम्यान फिर्यादी आदर्श तनपुरे याच्या हालचाली संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तो ऑनलाइन फॉरेक्स ट्रेडिंग करत असल्याची गोपनीय माहितीही पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली. सुरुवातीला त्याने माहिती लपवण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांच्या चौकशीत अखेर त्यानेच घरफोडीचा बनाव रचल्याची कबुली दिली.

https://www.prahaar.in/2026/11/21/agricultural-land-rates-will-apply-to-land-transactions-involving-gaushalas-announces-revenue-minister-chandrashekhar-bawankule/

ट्रेडिंगमध्ये पैसे बुडाले अन् घरफोडीचा बनाव रचला

पोलिस तपासात या संपूर्ण प्रकारामागील कारण समोर आले. दिवाळीच्या सणानिमित्त आदर्शची आई माहेरी गेली होती. त्यावेळी घरात असलेली १ लाख २५ हजार रुपयांची रोकड त्याने थोडी-थोडी करून स्वतःच्या एचडीएफसी बँक खात्यात जमा केली. त्यानंतर ही रक्कम ‘एक्सएमडी मॅट’ खात्याच्या माध्यमातून फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवली. मात्र, या ट्रेडिंगमध्ये त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. ट्रेडिंगमध्ये पैसे गमावल्याची बाब घरच्यांना समजू नये, या भीतीने त्याने घरफोडीचा बनाव रचला आणि घरातील रोकड चोरीला गेल्याची खोटी तक्रार पोलिसांत दिली. मात्र, पोलिसांच्या तपासात त्याचा हा बनाव उघड झाला.

बँक खाते आणि मोबाइलमधून महत्त्वाचे पुरावे

पोलिसांनी संबंधित बँकेकडून खात्याचे विवरण मिळवले. तसेच पंचनामा करून तरुणाचा मोबाइल जप्त करण्यात आला. मोबाइलमधील ‘एक्सएमडी मॅट’ खात्याशी संबंधित तपशील आणि बँक व्यवहारांची माहिती तपासल्यानंतर या प्रकरणातील संशय अधिक स्पष्ट झाला. त्यानंतर पोलिसांनी आदर्श तनपुरे याला अटक केली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल चिटणीस, उपनिरीक्षक दीपक मेढे आणि पोलीस अंमलदार बाळकृष्ण दौंड, साबीर शेख, विनोद बोरगे, विशाल दळवी, संदीप शिरसाठ, सत्यजित शिंदे, सूरज कदम, शिरीष तरटे, अतुल कोतकर, रमेश शिंदे, अतुल लाटे, संकेत धिवर आणि वैभव काळे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here