मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्या गोळीबार प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचने महत्त्वाची कारवाई केली आहे. या प्रकरणातील फरार आरोपी अभिषेक पंडित याच्याविरोधात लुकआऊट सर्क्युलर (LOC) जारी करण्यात आले आहे. अभिषेक हा या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिल पंडितचा भाऊ असल्याची माहिती आहे. गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना आर्थिक मदत आणि इतर प्रकारे सहकार्य केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. (Tiger Shroff Firing Case)
https://www.prahaar.in/2026/11/20/dhanushs-om-surpasses-raayan-in-advance-bookings-eyes-biggest-opening-of-his-career/
पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच अभिषेक फरार
अभिषेक पंडितला अटक करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रँचचे पथक हरियाणातील कर्नाल येथे गेले होते. मात्र, पोलिसांचे पथक पोहोचण्यापूर्वीच तो तेथून फरार झाल्याचे समोर आले आहे. अभिषेक हा टोळीच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी सांभाळत असल्याचा संशय पोलिसांना आहे. तो देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्याला अटक झाल्यास टोळीच्या आर्थिक व्यवहारांबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.
पत्नी सुनेहा पंडितच्या पोलीस कोठडीत वाढ
या प्रकरणात अभिषेकची पत्नी सुनेहा पंडित हिलाही पोलिसांनी अटक केली आहे. विशेष MCOCA न्यायालयाने तिच्या पोलीस कोठडीत 21 नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. सुनेहाच्या पतीच्या बँक खात्यातून झालेल्या व्यवहारांचा संघटित गुन्हेगारी टोळीशी संबंध आहे का, याची चौकशी पोलिसांना करायची आहे. विशेष सरकारी वकील सुनील गोन्साल्विस यांनी न्यायालयात या आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू असल्याची माहिती दिली.
18 ऑक्टोबरला जुहूमध्ये झाला होता गोळीबार
18 ऑक्टोबर रोजी जुहू परिसरात दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी टायगर श्रॉफवर गोळीबार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात राजस्थानमधील कोटा, दिल्ली आणि हरियाणातील सोनीपत येथून आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. 27 ऑक्टोबर रोजी या प्रकरणात मकोका कायद्यांतर्गत कलमेही वाढवण्यात आली. आता अभिषेक पंडितविरोधात जारी करण्यात आलेल्या लुकआऊट नोटीसमुळे तपासाला नवे वळण मिळाले आहे.