आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांची सध्या जगभरात मोठी चर्चा आहे. AI क्षेत्रातील दिग्गज कंपनी Anthropic ने शेअर बाजारात प्रवेश करताच मोठा इतिहास रचल्याचा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या IPO मुळे कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनीतील जवळपास 96 टक्के कर्मचारी डॉलर मिलियनेअर बनले असून, सुमारे 600 कर्मचाऱ्यांच्या शेअर्सचे मूल्य 100 दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास 830 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे.
CNN च्या रिपोर्टनुसार, खासगी शेअर्सच्या व्यवहारांशी संबंधित Hill.com या प्लॅटफॉर्मच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. कंपनीतील जवळपास 5,100 कर्मचाऱ्यांकडे प्रत्येकी 10 लाख डॉलरपेक्षा अधिक किमतीचे शेअर्स असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सप्टेंबर 2026 पर्यंत Anthropic मध्ये सुमारे 5,300 कर्मचारी कार्यरत होते.
IPO मधून उभारले 81.3 अब्ज डॉलर
रिपोर्टनुसार, कंपनीतील जवळपास 2,800 कर्मचाऱ्यांच्या शेअर्सचे मूल्य 1 कोटी डॉलरपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. तर सुमारे 600 कर्मचाऱ्यांकडे 10 कोटी डॉलरपेक्षा जास्त मूल्याचे शेअर्स असू शकतात. त्यामुळे कंपनीच्या IPO चा सर्वाधिक फायदा तिच्या कर्मचाऱ्यांना झाल्याचे चित्र आहे.Anthropic ने IPO मध्ये एका शेअरची किंमत 83 डॉलर निश्चित केली होती. ही किंमत कंपनीने सुरुवातीला निश्चित केलेल्या 70 ते 78 डॉलरच्या अपेक्षित श्रेणीपेक्षाही अधिक होती.
या IPO मधून कंपनीने 81.3 अब्ज डॉलरचा निधी उभारल्याचे सांगितले जात आहे. Nasdaq वर शेअरची सुरुवात 111.50 डॉलरने झाली; मात्र व्यवहाराच्या अखेरीस त्याची किंमत घसरून 97.17 डॉलरवर आली. IPO मधील ऑफर प्राइसच्या आधारे कंपनीचे मूल्यांकन सुमारे 1.5 ट्रिलियन डॉलर असल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
https://www.prahaar.in/2026/11/20/have-5000-rupees-been-credited-to-your-account-a-major-update-regarding-310-drought-affected-talukas-in-the-state/
कर्मचारी कसे झाले करोडपती ?
कर्मचाऱ्यांच्या या आर्थिक यशामागे कंपनीची स्टॉक बेस्ड कंपनसेशन पॉलिसी महत्त्वाची ठरली आहे. चांगल्या टॅलेंटला कंपनीशी जोडून ठेवण्यासाठी Anthropic ने पगारासोबत कर्मचाऱ्यांना कंपनीचे शेअर्स देण्याची पद्धत अवलंबली. 2021 मध्ये सुरू झालेल्या या कंपनीत 2024 च्या अखेरीस सुमारे 940 कर्मचारी होते. मात्र, सप्टेंबर 2026 पर्यंत ही संख्या वाढून जवळपास 5,300 वर पोहोचली. सुरुवातीच्या काळात कमी मूल्यांकन असताना शेअर्स मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या हिस्सेदारीचे मूल्य IPO नंतर मोठ्या प्रमाणात वाढले.
विशेष म्हणजे, कर्मचाऱ्यांना शेअर्स विकण्याबाबतही काही सवलती देण्यात आल्या आहेत. गैर-संस्थापक कर्मचारी आणि पात्र व्यक्तींना पहिल्याच दिवशी त्यांच्या हिस्सेदारीतील 10 टक्के शेअर्स विकण्याची परवानगी असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच आर्थिक वर्ष 2026 च्या निकालांनंतर आणखी 35 टक्के हिस्सेदारी विकण्याचा पर्याय मिळू शकतो.
सॅन फ्रान्सिस्कोच्या रिअल इस्टेट मार्केटवरही परिणाम ?
Anthropic च्या IPO चा परिणाम केवळ शेअर बाजारापुरता मर्यादित राहण्याची शक्यता नाही. कंपनीतील सध्याचे आणि माजी कर्मचारी मोठ्या प्रमाणात संपत्तीचे मालक झाल्याने अमेरिकेतील रिअल इस्टेट मार्केटवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. CNBC च्या रिपोर्टनुसार, Redfin च्या विश्लेषणात Anthropic च्या कर्मचाऱ्यांकडे असलेल्या एकत्रित संपत्तीच्या जोरावर सॅन फ्रान्सिस्कोमधील जवळपास 9 टक्के घरे खरेदी करता येऊ शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कर्मचारी आपल्या शेअर्सच्या आधारे कर्ज घेऊन घर खरेदीची क्षमता वाढवू शकतात.
दरम्यान, कंपनीने कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेअर्समधील काही हिस्सा सामाजिक कार्यांसाठी दान करण्याचाही पर्याय दिला आहे. कंपनीच्या सातही संस्थापकांनी आपल्या संपत्तीपैकी 80 टक्के हिस्सा परोपकारी कार्यांसाठी देण्याचा संकल्प केल्याचेही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. एकूणच, AI क्षेत्रातील वाढत्या संधींचा फायदा केवळ कंपनीलाच नव्हे, तर तिच्या कर्मचाऱ्यांनाही किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, याचे Anthropic हे उदाहरण ठरत असल्याचे चित्र आहे.