Home ताज्या घडामोडी बांगलादेशमध्ये पुन्हा आगडोंब, राजधानी ढाकामध्ये नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ

बांगलादेशमध्ये पुन्हा आगडोंब, राजधानी ढाकामध्ये नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ

0
बांगलादेशमध्ये पुन्हा आगडोंब, राजधानी ढाकामध्ये नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ
फोटो सौजन्य: सोशल मीडिया (X Account)

मुंबई: बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडताना दिसत आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बंदी घातलेल्या आवामी लीग पक्षाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या अगदी आधी, देशभरात मोठ्या प्रमाणावर अशांतता पसरली आहे. राजधानी ढाकामध्ये अनेक ठिकाणी जाळपोळच्या घटना घडल्या आहेत.

गेल्या दोन दिवसांमध्ये, देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये जसे की सिल्हेट, राजशाही, बारिसाल आणि फरिदपूर येथे युनूस यांच्या ग्रामीण बँकेच्या अनेक शाखांना आग लावण्यात आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी चटगावच्या पांचलाईस परिसरामध्ये अंतरिम सरकारचे माजी प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या वडिलोपार्जित घराला आग लावली .

दरम्यान, बांगलादेशमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान तारिक रहमान यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) कार्यकर्त्यांनी रात्री ढाका येथे दोन आवामी लीग नेत्यांच्या घरांवर हल्ला करत त्यांच्या घराला आग लावली होती.

https://www.prahaar.in/2026/11/18/voyager-1-reaches-26-billion-km-away-how-does-it-get-power-for-49-years-nasa-spacecraft-sets-many-records-in-history/

अनेक जिल्ह्यांमध्ये बॉम्बस्फोट, अनेक नेत्यांचा मृत्यू

देशातील 64 प्रशासकीय जिल्ह्यांपैकी 28 जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. शिवाय, अनेक वाहनांची जाळपोळ सुद्धा यावेळी करण्यात आली. ढाकामधील या हिंसाचारात आतापर्यंत किमान चार जण जखमी झाले आहेत. पश्चिम नराईल जिल्ह्यात, आवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी बीएनपीच्या मोर्चावर हल्ला केल्याने सत्ताधारी पक्षाचे दोन स्थानिक नेत्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. फरिदपूर आणि पिरोजपूर येथे बीएनपीचा एक नेता आणि एक वाहतूक कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे.

5 ऑगस्ट 2024 रोजी एका विद्यार्थी आंदोलनानंतर सत्तेवरून पायउतार झाल्यापासून भारतात राहत असलेल्या शेख हसीना यांना, मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी एका विशेष न्यायाधिकरणाने गेल्या वर्षी अनुपस्थितीत सुनावलेल्या मृत्युदंडाच्या वर्षपूर्तीनिमित्त अवामी लीगने या लॉकडाउनची हाक दिली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा झाली तरी डिसेंबरमध्ये बांगलादेशला परतणार असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासून तणाव वाढला आहे. मंगळवारी, त्यांच्या मूळ गावी तुंगीपारा येथे सुमारे 30 संशयित समर्थकांच्या अटकेनंतर शेकडो लोकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला, ज्यामुळे पोलिसांना ते ठाणे रिकामे करावे लागले.

https://www.prahaar.in/2026/11/18/saudi-airstrikes-destroy-60-houthi-military-bases-killing-17-drone-attack-on-kuwait-sparks-massive-panic-in-middle-east/

बुधवारी रात्री, पंतप्रधान तारिक रहमान यांनी लोकशाहीवादी शक्तींना एकत्र येण्याचे आवाहन केले आणि आवामी लीगला “दहशतवादी संघटना” आणि “पराभूत फॅसिस्ट शक्ती” म्हटले. मंगळवारी रात्री संसदेत बोलताना रहमान म्हणाले, “2024 च्या भावनेने आपण पुन्हा एकदा एकत्र येऊया, जेव्हा आपण हुकूमशाही शक्तींना देशातून हाकलून दिले होते, आणि त्यांचा निर्णायक पराभव निश्चित करूया.” ‘द डेली स्टार’च्या वृत्तानुसार, त्यांनी खासदारांना केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता रस्त्यावर उतरण्यास सांगितले आहे.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी, हसीना यांच्या गावी, गोपालगंजसह संवेदनशील जिल्ह्यांमध्ये बांगलादेश सीमा रक्षक दलाचे हजारो निमलष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत.

पोलिसांनी 24 तासांच्या कारवाईदरम्यान एकट्या ढाकामध्ये 565 जणांना अटक केली, ज्यात हसीना यांच्या मंत्रिमंडळातील माजी शिक्षणमंत्री नुरुल इस्लाम नाहिद यांचाही समावेश आहे. गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांनी ऑडिओ आणि व्हिडिओ पुराव्यांच्या आधारे समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. युनूस यांच्या कार्यकाळात, 2024 मध्ये हसीना सरकार कोसळल्यानंतर, बांगलादेशमध्ये आवामी लीग पक्षावर बंदी घालण्यात आली होती आणि संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांचे धनमंडी येथील निवासस्थान तसेच 1971 च्या मुक्तिसंग्रामाची स्मारके नष्ट करण्यात आली होती. आता, तोच हिंसाचार एका नव्या रूपात संपूर्ण देशाला आपल्या विळख्यात घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here