मुंबई (विशेष प्रतिनिधी) : धारावी येथील छोटा शीव रुग्णालयातील डायलिसीस केंद्राच्या खासगीकरणाचा प्रस्ताव सुधार समितीत फेटाळून लावण्यात आला आहे. महापालिकेच्या मालकीच्या मशिन्स आणि जागाही महापालिकेच्या मालकीच्या असल्याने खासगी संस्थेला चालवण्यास देण्यास सुधार समितीने विरोध दर्शवला आहे. शीव रुग्णालय हे महापालिकेचे प्रमुख रुग्णालय आहे. मग त्याठिकाणी खासगी संस्थेच्या माध्यमातून सेवा देण्याऐवजी महापालिकेच्यावतीनेच हे केंद्र चालवले जावे अशी मागणी करत प्रशासनाने खासगीकरणाचा आणलेला प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवला.
शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे डायलिसिस युनिटमध्ये १७डायलिसिस मशिन्स असून त्यापैकी ४ मेडिकल आय.सी.यू.मध्ये आहेत तर १३ मशिन्स डायलिसिस कक्षामध्ये किडनीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी दाखल रुग्णांसाठी वापरली जातात. यापैकी कोणतीही मशीन दीर्घकालीन किंवा मेंटेनन्स डायलिसिससाठी वापरली जात नाही. लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय हे टर्शरी केअर सेंटर व विशेषकृत आणि अतिविशेषकृत वैद्यकीय महाविद्यालय असल्याने सन २०२३ पासून दरवर्षी २ जागा असलेला डिएनबी नेफ्रोलॉजी कोर्स या रुग्णालयात चालविला जात आहे. डायलिसिस गंभीर आजारी रूग्णांच्या उपचारासाठी महत्वाचे असण्याबरोबरच नेफ्रोलॉजीच्या सुपर स्पेशालिटी कोर्ससाठी प्रशिक्षणाचा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे धारावी येथील डायलिसिस केंद्र येथे सार्वजनिक खाजगी सहभाग (पीपीपी) तत्वावर १० वर्षाच्या कालावधीसाठी मे. एपेक्स किडनी केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला चालवण्यास देण्याचा प्रस्ताव पटलावर मंजुरीसाठी ठेवला होता. यावर बोलताना उबाठाचे सचिन पडवळ यांनी शीव रुग्णालय हे प्रमुख रुग्णालय असताना आणि तिथे डॉक्टरांची सेवा असताना खासगी संस्थेची नेमणूक का करण्यात येत आहे असा सवाल केला. ही संस्था १२०० रुपये आकारणार आणि बाकीचे साहित्य रुग्णाला आणावे लागणार म्हणजे रुग्णाला २५०० रुपयांचाच खर्च येणार आहे. त्यामुळे रुग्णांना सेवा ऐवजी त्रासच अधिक होणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/18/dadar-railway-station-will-soon-be-renamed-chaityabhoomi-chief-minister-devendra-fadnavis-has-assured-that-the-necessary-formalities-will-be-completed-during-the-legislative-session/
तर काँग्रेसच्या मेेहेर हैदर यांनी मुंबईत अशाप्रकारे किती डायलिसीस सेंटर चालवले जातात असा सवाल करत ऍपेक्स कंपनीचा कुपर रुग्णालयातील अनुभव वाईट असल्याचे सांगितले. तर काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी महापालिका आपल्या जबाबदारीपासून मागे का हटत आहे असा सवाल करत मशीन आपली असताना त्यांच्यावर ही जबाबदारी का टाकली जात आहे. तर प्रकाश गंगाधरे यांनी एम.टी.अगरवाल मध्ये आयसीयू सेंटरसाठी अशाप्रकारे खासगी संस्थेची निवड केली होती. पण तिथे डॉक्टरही नव्हते असा अनुभव सांगत यावर अकंशु कुणी ठेवणार असा सवाल केला. मशिन आपली आणि जागाही आपली तर केवळ मनुष्यबळ नाही म्हणून खासगी संस्थेला का द्यावे असा सवाल करत त्यांनी हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची मागणी केली. स्वप्ना म्हात्रे यांनी कुपरसह इतर ठिकाणी या ऍपेक्स कंपनीने चांगली सेवा दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा अहवाल कुणी बनवला अशी विचारणा करत जर याठिकाणी डायलिसीसबाबत पूर्ण अहवाल येईपर्यंत हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे सुधार समिती संध्या दोषी यांनी हा प्रस्ताव दप्तरी दाखल करत प्रशासनाकडे परत पाठवून दिला.