मुंबई : सातारा जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेवरून झालेल्या संघर्षानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बाजूला ठेवत सत्ता मिळवली आहे. बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयसिंह पाटील उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी एकत्र येत केलेल्या या राजकीय खेळीमुळे जिल्ह्यातील महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकांपैकी भाजपचे नऊ, राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ आणि शिवसेनेचे चार संचालक निवडून आले होते. संख्याबळाच्या दृष्टीने भाजप सर्वांत मोठा पक्ष असला, तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध केली. अध्यक्षपदासाठी उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी, तर उपाध्यक्षपदासाठी दीपक चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अन्य उमेदवार नसल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाली.
https://www.prahaar.in/2026/11/18/special-mosquito-control-drive-in-navi-mumbai-chemical-spraying-to-be-carried-out-in-various-areas-until-november-21/
या निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील घडामोडींचीही चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेत भाजपने अवघ्या एका मताच्या फरकाने सत्ता मिळवली होती. त्या निवडणुकीवेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही सदस्यांना मतदानासाठी पोहोचण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप झाला होता. पोलिसांनी काही सदस्यांना जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरच ताब्यात घेतल्याने गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्याशी पोलिसांची धक्काबुक्की झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. या संघर्षानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येत भाजपला सत्तेबाहेर ठेवले.
बँकेचे संचालक आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, अशी भूमिका मांडली होती. दुसरीकडे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे म्हटले होते. अखेर देसाई आणि मकरंद पाटील यांनी भाजपला सोबत न घेता अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवड निश्चित केली. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीतील घटक पक्षांमधील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहेत.
उदयसिंह पाटील हे दिवंगत विलासकाका उंडाळकर यांचे पुत्र असून, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. सातारा जिल्हा परिषद सदस्य असण्याबरोबरच ते रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि कोयना सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी विलासकाका उंडाळकर यांचे जिल्हा बँकेवर वर्चस्व होते. तर, उपाध्यक्षपदी निवड झालेले दीपक चव्हाण हे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे समर्थक आहेत. त्यांनी फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणूनही काम केले आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.