Home महाराष्ट्र नाशिक Nashik Crime : सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवून अवैध सावकारी ! पंचवटीतील सराफा व्यावसायिकावर गुन्हा दाखल

Nashik Crime : सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवून अवैध सावकारी ! पंचवटीतील सराफा व्यावसायिकावर गुन्हा दाखल

0
Nashik Crime : सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवून अवैध सावकारी ! पंचवटीतील सराफा व्यावसायिकावर गुन्हा दाखल

नाशिक : सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवून नागरिकांना रोख रक्कम देणे आणि त्यावर व्याज आकारून अवैध सावकारीचा व्यवसाय केल्याप्रकरणी नाशिकमधील पंचवटी परिसरातील सराफा व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमानवाडी, मखमलाबाद रोड येथील सर्वेश ज्वेलर्सचे मालक नितीन सुरेश दुसाणे यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

तक्रारीनंतर सहकार विभागाकडून चौकशी

या प्रकरणी सहकार विभागातील मुख्य लिपिक मंगेश मधुकर वैष्णव यांनी सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे. अक्षय गोपाळ शेरताटे यांनी नितीन दुसाणे यांच्याविरोधात अवैध सावकारी व्यवसाय सुरू असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर सहकार विभागाने पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू केली.

सर्वेश ज्वेलर्सवर सहकार विभागाचा छापा

22 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सहकार विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात सर्वेश ज्वेलर्स या दुकानावर छापा टाकून झडती घेतली. या कारवाईदरम्यान अवैध सावकारीशी संबंधित अनेक कागदपत्रे आणि व्यवहारांचे पुरावे जप्त करण्यात आले. यामध्ये न्यू श्रीनिवास फायनान्स प्रा. लि.च्या अनेक मूळ पावत्या, विविध व्यक्तींच्या हस्तलिखित चिठ्ठ्या आणि 13 कर्जव्यवहारांची माहिती असलेला तक्ता आढळून आला.

सहकार विभागाच्या तपासानुसार, संबंधित व्यावसायिक दुकानात येणाऱ्या नागरिकांना रोख रक्कम उसनी देत होता. त्याबदल्यात नागरिकांकडून सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवले जात होते. त्यानंतर हे दागिने न्यू श्रीनिवास फायनान्स प्रा. लि.मध्ये स्वतःच्या नावावर गहाण ठेवून त्याआधारे कर्जरूपाने रक्कम मिळवली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. दागिने गहाण ठेवणाऱ्या नागरिकांना त्याबदल्यात रोख रक्कम दिली जात होती. तसेच त्यांच्याकडून व्याजही स्वीकारले जात असल्याचे जप्त कागदपत्रांवरून निष्पन्न झाल्याचा दावा सहकार विभागाने केला आहे.

https://www.prahaar.in/2026/11/18/two-two-wheelers-collide-head-on-in-satpur-two-youths-killed/

सुनावणीनंतर अवैध सावकारीचे प्रथमदर्शनी पुरावे

छाप्यात जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. तसेच संबंधित व्यावसायिकाला आपली बाजू मांडण्यासाठी सुनावणीची संधी देण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेनंतर संबंधितांकडून अवैध सावकारीचा व्यवसाय सुरू असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याचे सहकार विभागाने म्हटले आहे. त्यानंतर शासनाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यासाठी अधिकाऱ्याला प्राधिकृत करण्यात आले.

महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणी 16 नोव्हेंबर रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 मधील कलम 23, 39, 42 आणि 45 अंतर्गत पुढील कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे पंचवटी परिसरातील सराफा व्यावसायिकांमध्ये चर्चेला उधाण आले असून, अवैध सावकारीच्या व्यवहारांवर सहकार विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here