Mumbai BEST Bus Fire: मुंबईतील कुलाबा येथील ससून डॉकजवळ आज, बुधवार 18 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी मार्ग क्रमांक 139 च्या बेस्ट बसला आग लागली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. परंतु, बसचे मोठे नुकसान झाले आहे. दक्षिण मुंबईतील ससून डॉकजवळ सकाळी बेस्ट बसच्या स्टार्टरजवळ ठिणग्या पडल्या. त्यातून धूर आणि आगीच्या ज्वाला पसरल्या. ही घटना सकाळी 7 च्या सुमारास घडली, जेव्हा बस कुलाबा डेपोकडून गीता नगरच्या दिशेने जात होती. MH-01-CV-8159 या नोंदणी क्रमांकाच्या बसला आग लागली आहे. आगीत गाडीचे मोठे नुकसान झाले.
व्हिडिओमध्ये, ससून डॉकच्या गेटजवळ बस उभी असल्याचे दिसत आहे. बसमधून मोठ्या प्रमाणावर धुर बाहेर पडत आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या रहिवाशांमध्ये यामुळे घबराट निर्माण झाली आहे. त्यांपैकी काही जण प्रवासी आणि कर्मचारी यांना मदत करण्यासाठी बसकडे धावताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओमध्ये रस्त्यावर बेस्ट बसला आग लागल्याचा नेमका क्षण कैद झाला आहे.
https://www.prahaar.in/2026/11/18/mumbai-airport-news-no-flight-no-information-spicejet-passengers-express-outrage-at-mumbai-airport/
चालकाच्या प्रसंगावधानाने आग नियंत्रित
ससून डॉक बस स्टॉपवर पोहोचल्यावर चालकाच्या लक्षात आले की, बसच्या स्टार्टरजवळ ठिणग्या पडत आहेत. त्यानंतर लगेचच धूर निघू लागला आणि आग लागली. चालकाने सुरुवातीला बसमध्ये उपलब्ध असलेल्या अग्निशामक यंत्राचा वापर केला. त्यातून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग नियंत्रणात न आल्यामुळे चालकाने तातडीने अग्निशमन दलाला कळवले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी वाहनावर पाणी फवारून आग विझवली. सुदैवाने बसमध्ये यावेळी जास्त प्रवासी नव्हते. घटनेच्या वेळी वाहनात केवळ एकच प्रवासी होता. तो देखील सुखरूप आहे. यात कोणीही जखमी झाले नाही.
तसेच, कुलाबा येथील एका डेपो अधिकाऱ्याला घटनास्थळी पाठवण्यात आले असून, पुढील आवश्यक कारवाईसाठी या घटनेची माहिती बस नियंत्रण केंद्राला देण्यात आली आहे.घटनेची माहिती बस नियंत्रण केंद्राला देण्यात आली असून, कुलाबा डेपोतील अधिकाऱ्यालाही घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत पुढील तपास आणि आवश्यक तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे. बेस्ट बसला लागलेल्या आगीच्या या घटनेमुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीतील वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि वेळेत करण्यात आलेल्या मदतकार्यामुळे मोठा अनर्थ टळला.