Home देश झारखंडमधील एनटीपीसी प्रकल्पात कन्व्हेयर बेल्टचा सांगाडा कोसळला, 3 कामगारांचा जागीच मृत्यू

झारखंडमधील एनटीपीसी प्रकल्पात कन्व्हेयर बेल्टचा सांगाडा कोसळला, 3 कामगारांचा जागीच मृत्यू

0
झारखंडमधील एनटीपीसी प्रकल्पात कन्व्हेयर बेल्टचा सांगाडा कोसळला, 3 कामगारांचा जागीच मृत्यू
झारखंडमधील एनटीपीसी प्रकल्पात कन्व्हेयर बेल्टचा सांगाडा कोसळला (Photo: X)

झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील टंडवा येथे असलेल्या राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या प्रकल्पात बुधवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण दुर्घटना घडली आहे. प्रकल्पातील बांधकाम सुरू असलेल्या कन्व्हेयर बेल्टचा लोखंडी सांगाडा अचानक तुटून खाली कोसळल्याने 3 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अन्य 1 कामगार गंभीर जखमी झाला असून, ढिगाऱ्याखाली आणखी काही कामगार अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही भयंकर दुर्घटना एनटीपीसी प्रकल्पातील ‘सीएचपी जेएच-1’ या ठिकाणी घडली. या ठिकाणी कन्व्हेयर बेल्ट उभारणीचे काम वेगाने सुरू होते आणि अनेक कामगार सांगाड्यावर चढून काम करत होते. मात्र, अचानक या सांगाड्याचा मुख्य भाग तुटला आणि संपूर्ण सांगाडा क्षणात खाली कोसळला. सांगाडा कोसळताच त्यावर काम करणारे कामगार खाली पडून ढिगाऱ्याखाली दबले गेले. या दुर्घटनेनंतर संपूर्ण प्रकल्प परिसरात एकच गोंधळ आणि आरडाओरड सुरू झाली.

या अपघाताची माहिती मिळताच प्रकल्प व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाची धावपळ उडाली. चतरा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनिमेष मैथानी यांनी या दुर्घटनेत 3 कामगारांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. घटनेची माहिती मिळताच टंडवा पोलीस ठाण्याचे प्रभारी विपिन कुमार आपल्या पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलीस आणि प्रशासनाच्या पथकाकडून युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू आहे.

https://www.prahaar.in/2026/11/18/colleagues-tied-up-and-set-businessman-on-fire-2-shocking-incidents-in-bengaluru/

अपघाताचे दृश्य अत्यंत अंगावर काटा आणणारे होते. एका कामगाराचा मृतदेह तुटलेल्या कन्व्हेयर बेल्टच्या सांगाड्यातच लटकलेल्या अवस्थेत दिसून आला, तर इतर कामगार लोखंडी सांगाड्याच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. जखमी कामगारांना तातडीने एनटीपीसी परिसरातील संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक स्तरावर सांगाड्याच्या रचनेतील तांत्रिक त्रुटीमुळे हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, सखोल तपासानंतरच या दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.

या कन्व्हेयर बेल्टच्या बांधकामाचे मुख्य कंत्राट ‘थायसन’ या कंपनीला देण्यात आले होते. त्यानंतर पुढे हे काम ‘सिंप्लेक्स’ या पेटी कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून केले जात होते. कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे नियम पाळले गेले होते का, याची चौकशी आता प्रशासनाने सुरू केली असून, वरिष्ठ अधिकारी संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here