ज्या वयात कुटुंबाची साथ आणि प्रेमाची सर्वाधिक गरज असते, त्याच वयात घरच्याच व्यक्तीने विश्वासघात केल्याचा संतापजनक प्रकार नवी दिल्लीतून समोर आला आहे. एका 87 वर्षीय निवृत्त भारतीय नौदल अधिकाऱ्याच्या बँक खात्यावर त्यांच्याच 22 वर्षीय नातवाने डल्ला मारत तब्बल 29.5 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. नातवाने आपल्या मित्राच्या मदतीने हे पैसे लांबवले आणि त्यातून मौजमजा, सहली तसेच महागड्या पार्ट्यांवर उधळपट्टी केल्याचे उघडकीस आले आहे.
हा संपूर्ण प्रकार एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत सुरू होता. वृद्ध अधिकाऱ्याच्या मुलाच्या लक्षात आले की त्यांच्या वडिलांच्या बँक खात्यातून वारंवार संशयास्पद रक्कम काढली जात आहे. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पूर्व जिल्हा पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असता, तक्रारदाराचा स्वतःचा 22 वर्षांचा मुलगा अभिषेक राघव आणि त्याचा मित्र तुषार चौधरी (वय 22) यांनीच हा कट रचल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/18/colleagues-tied-up-and-set-businessman-on-fire-2-shocking-incidents-in-bengaluru/
पूर्व जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त (DCP) राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेकने अत्यंत चलाखीने स्वतःचा मोबाईल नंबर आजोबांच्या बँक खात्याशी जोडला होता. या तांत्रिक प्रवेशाचा गैरवापर करून त्याने तुषारच्या संगनमताने लाखो रुपये परस्पर ट्रान्सफर केले. तपासात असे दिसून आले की, यातील 9.2 लाख रुपये अभिषेकच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक खात्यात, तर तब्बल 20.2 लाख रुपये तुषारच्या बँक खात्यात वळवण्यात आले होते.
लुटीच्या या पैशातून दोन्ही तरुणांनी अक्षरशः ऐषोआरामाचे जीवन जगायला सुरुवात केली होती. त्यांनी मनाली, नैनिताल आणि ओडिशा येथे महागड्या सहली केल्या, तसेच नोएडा येथे मित्रांसोबत मोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले. इतकेच नव्हे, तर आरोपींनी 2.7 लाख रुपयांची एक जुनी कार खरेदी केली आणि त्या कारमध्ये महागडी म्युझिक सिस्टीम बसवण्यासाठी तब्बल 1.2 लाख रुपये खर्च केले.
पोलिसांनी बँकिंग रेकॉर्ड, केवायसी कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन मोबाईल फोन आणि फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेली कार जप्त केली आहे. आरोपी अभिषेक खुर्जा येथून ‘बीए एलएलबी’ चे शिक्षण घेत आहे, तर त्याचा साथीदार तुषार नर्सिंगचा कोर्स करत आहे. उर्वरित रक्कम हस्तगत करण्यासाठी आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी दोघांचीही पोलीस कोठडी मिळवली आहे.