अहिल्यानगर (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील दौंड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत बाक्या बंड्या काळे (वय ३९, रा. आखोणी, ता. कर्जत), गोट्या बंडू काळे (वय २५, रा. आखोणी, ता. कर्जत) आणि धोंड्या ईश्वर भोसले (वय २८, रा. बेलगाव, ता. कर्जत) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर शुभम गहिनीनाथ भोसले (रा. बेलगाव), रोहित नितीन चव्हाण आणि सुमित नितीन चव्हाण (दोघेही रा. केडगाव, ता. अहिल्यानगर) हे तिघे पसार झाले आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/18/provide-skill-training-to-local-youth-alongside-port-projects-minister-nitesh-rane/
जिल्ह्यात दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंगचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे व पथक कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना राशीन ते चिलवडी रस्त्यावरील पिराच्या माळावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने काही जण मोटारसायकलवरून येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून संशयितांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोटारसायकली टाकून पळ काढला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून तिघांना पकडले.
पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण २ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये तीन मोटारसायकली, तीन मोबाईल, एक कटावणी, एक पान्हा, मिरची पूड, एक कोयता आणि स्क्रू ड्रायव्हर यांचा समावेश आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेला धोंड्या ईश्वर भोसले हा पुणे जिल्ह्यातील दौंड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार आरोपी असून, या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) लावण्यात आलेला आहे. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक अनंत सालगुडे आणि अंमलदार अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, भीमराव खर्से, अमोल कोतकर, प्रताप देवकाते, दीपक जाधव व जालिंदर साखरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.