Home ब्रेकिंग न्यूज मराठी चित्रपटाला हवी प्रभावी ‘ब्रँडिंग’ची जोड! ‘चित्रपताका’ महोत्सवात दिग्गजांचा मोलाचा सल्ला

मराठी चित्रपटाला हवी प्रभावी ‘ब्रँडिंग’ची जोड! ‘चित्रपताका’ महोत्सवात दिग्गजांचा मोलाचा सल्ला

0
मराठी चित्रपटाला हवी प्रभावी ‘ब्रँडिंग’ची जोड! ‘चित्रपताका’ महोत्सवात दिग्गजांचा मोलाचा सल्ला
'चित्रपताका' महोत्सवात दिग्गजांचा मोलाचा सल्ला

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम कथा आणि प्रतिभावान कलाकारांची कमतरता नाही; परंतु त्यांना योग्य प्रसिद्धी आणि ‘ब्रँडिंग’ची जोड मिळणे काळाची गरज बनली आहे. केवळ चित्रपटाला एखादे नाव देणे म्हणजे ब्रँडिंग नव्हे, तर प्रेक्षकांच्या मनावर त्या चित्रपटाची स्वतंत्र आणि प्रभावी ओळख निर्माण करणे गरजेचे आहे, असा मोलाचा सल्ला प्रसिद्ध जाहिरात तज्ज्ञ भरत दाभोळकर यांनी दिला. सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात आयोजित 15 नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या अधिकृत ‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सवात हा विशेष परिसंवाद पार पडला.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा चार दिवसीय महोत्सव दिमाखात संपन्न होत आहे. महोत्सवाच्या अंतर्गत मंगळवारी ‘ॲडगुरूंचा सल्ला… मराठी सिनेमाची जाहिरात, विपणन आणि प्रसिद्धीतंत्रे’ या विषयावर आयोजित परिसंवादात चित्रपटांचे ब्रँडिंग, मार्केटिंग आणि प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडींवर सविस्तर मंथन झाले. या सत्रात जाहिरात तज्ज्ञ भरत दाभोळकर, सुनील महाडिक आणि ख्यातनाम दिग्दर्शक रवी जाधव यांनी सहभाग घेतला, तर दिग्दर्शक विजू माने यांनी संवाद साधला.

https://www.prahaar.in/2026/11/17/approval-granted-to-declare-drought-in-four-talukas-instructions-issued-to-conduct-a-comprehensive-survey-of-the-remaining-talukas-and-submit-a-report-at-the-next-meeting/

व्यावसायिक उत्पादन म्हणून पाहण्याची गरज

या चर्चेत आपले विचार मांडताना दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले की, चित्रपटाचे नाव, पोस्टर, रंगसंगती आणि दृश्यात्मक ओळख यांचा थेट परिणाम प्रेक्षकांच्या मनावर होत असतो. त्यामुळे केवळ एक कलाकृती म्हणून पाहण्याऐवजी चित्रपटाकडे एक दर्जेदार ‘व्यावसायिक उत्पादन’ म्हणून पाहण्याची मानसिकता निर्माण केली पाहिजे. मराठी चित्रपटांच्या सादरीकरणातील त्रुटींवर प्रकाश टाकताना सुनील महाडिक यांनी नाव, पोस्टर, पॅकेजिंग आणि श्रेयनामावली (Credits) यांना योग्य महत्त्व देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. “केवळ मराठी चित्रपट आहे म्हणून प्रेक्षकांनी तो पाहावा, अशी जुनी अपेक्षा न ठेवता त्याचे एकंदरीत सादरीकरण अतिशय आकर्षक असले पाहिजे,” असे ते म्हणाले. सूत्रसंचालन करताना दिग्दर्शक विजू माने यांनी आपले अनुभव मांडत, आजच्या ‘जेन-झी’ (Gen-Z) पिढीला चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना, सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि हटके प्रसिद्धीतंत्रांची गरज असल्याचे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here