बंगालच्या उपसागरात सध्या सुरू असलेल्या हवामान बदलांनी हवामान शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांत तीन चक्रीवादळांची निर्मिती होणे ही जरी सामान्य बाब असली, तरी या तिन्ही वादळांचा मोर्चा आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर असणे ही अत्यंत दुर्मिळ आणि चिंतेची बाब बनली आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्र यांच्या मते, यामागे अल-नीनो आणि हिंद महासागर डायपोल यांसारख्या प्रणालींची मोठी भूमिका आहे. असेच हवामान पॅटर्न 1987 मध्ये सुद्धा पाहायला मिळाले होते. अल-नीनोच्या परिस्थितीमुळे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात आणि कमी अक्षांशांवर चक्रीवादळे तयार होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते. परिणामी, अशी वादळे बहुतांश वेळा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनाऱ्याकडे वाटचाल करतात. प्रशांत महासागरातील तापमानातील बदलांचा थेट प्रभाव जागतिक वातावरणीय अभिसरणावर पडतो, ज्याचा परिणाम हिंद महासागराच्या क्षेत्रावरही दिसून येतो.
लैंडफॉल आणि संभाव्य धोका
बंगालच्या उपसागरात विकसित होत असलेला हा नवीन सिस्टीम आंध्र प्रदेशसाठी अत्यंत गंभीर धोका ठरू शकतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हा वादळ आणखी तीव्र होऊन 20 नोव्हेंबर रोजी दुपारी नेल्लोर आणि तुनी दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याशी धडकण्याची शक्यता आहे. जेव्हा हे वादळ धडकेल, तेव्हा वाऱ्याचा वेग 120 ते 130 किमी प्रति तास असणार असून वाऱ्याचे झोके 145 किमी प्रति तास गाठू शकतात. सध्या या सिस्टीममध्ये वाऱ्याचा वेग 75 ते 85 किमी प्रति तास आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत याचे गंभीर चक्रीवादळात आणि 19 नोव्हेंबरपर्यंत अतिगंभीर चक्रीवादळात रूपांतर होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/17/cyclone-akkan-holidays-have-been-declared-for-schools-in-some-parts-of-the-country-and-pregnant-women-have-been-moved-to-safe-locations/
मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती
आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांवर या वादळाचा सर्वाधिक प्रभाव पडणार आहे. 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही भागांत अवघ्या 24 तासांत 20 ते 30 सेंमी पर्यंत पाऊस होऊ शकतो, ज्यामुळे शहरांमध्ये पाणी साचणे आणि पूर येण्याचा धोका वाढला आहे. लँडफॉल दरम्यान समुद्राची पातळी सामान्यपेक्षा 1 ते 2 मीटर वर जाऊ शकते, ज्यामुळे पश्चिम गोदावरी आणि कोनासीमासारख्या सखल भागांत संकट आणखी गहिरे होईल.