Home ब्रेकिंग न्यूज ST Bus : रात्रीच्या अंधारात दोन अल्पवयीन मुलींना बसमधून उतरवले; चालक आणि वाहक निलंबित

ST Bus : रात्रीच्या अंधारात दोन अल्पवयीन मुलींना बसमधून उतरवले; चालक आणि वाहक निलंबित

0
ST Bus : रात्रीच्या अंधारात दोन अल्पवयीन मुलींना बसमधून उतरवले; चालक आणि वाहक निलंबित
AI IMAGE

Maharashtra News: एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना रात्रीच्या वेळी अंधारात रस्त्यावर उतरवल्याच्या घटनेची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी एसटी महामंडळाने तातडीने कारवाई करत संबंधित बसचालक आणि वाहकाला निलंबित केले आहे. चालक अनिल सावरे आणि वाहक उदेभान मेश्राम यांच्यावर 16 नोव्हेंबर 2026 पासून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?

14 नोव्हेंबर 2026 रोजी भंडारा आगाराच्या एसटी बसमधून दोन अल्पवयीन मुली प्रवास करत होत्या. त्यांना रात्रीच्या वेळी रोहा येथे अंधारात बसमधून उतरवण्यात आल्याची बातमी स्थानिक वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाली होती. या घटनेमुळे प्रवाशांच्या, विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला.

चौकशीनंतर चालक आणि वाहकावर कारवाई

माध्यमांमधील वृत्तांची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार भंडारा विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापक यांच्यामार्फत प्राथमिक चौकशी करण्यात आली. या चौकशीत संबंधित चालक आणि वाहकाची जबाबदारी निश्चित करण्यात आली. त्यानंतर दोघांना निलंबित करण्यात आले असून, एसटी महामंडळाच्या नियमानुसार पुढील कारवाई सुरू आहे.

विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची जबाबदारी एसटीची

भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी एसटी प्रशासनाने आवश्यक सूचना आणि परिपत्रक जारी करावे, असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी एसटीची असून, कर्मचाऱ्यांनी मुलांची स्वतःच्या मुलांप्रमाणे काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. भविष्यात अशा प्रकाराची पुनरावृत्ती झाल्यास संबंधितांना सेवेतून बडतर्फ करण्याचा इशाराही परिवहन मंत्र्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here