Home ब्रेकिंग न्यूज Prince William Kulhad Chai : मुंबईच्या रस्त्यावर अवतरले ‘शाही पाहुणे’! सचिन तेंडुलकरसोबत प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांनी घेतला ‘कुल्हड चहा’चा आस्वाद;

Prince William Kulhad Chai : मुंबईच्या रस्त्यावर अवतरले ‘शाही पाहुणे’! सचिन तेंडुलकरसोबत प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांनी घेतला ‘कुल्हड चहा’चा आस्वाद;

0
Prince William Kulhad Chai : मुंबईच्या रस्त्यावर अवतरले ‘शाही पाहुणे’! सचिन तेंडुलकरसोबत प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांनी घेतला ‘कुल्हड चहा’चा आस्वाद;

चहावाला मनोज म्हणाला, “हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास क्षण!”

मुंबई : मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरात सोमवारी एक अत्यंत अनोखा आणि सर्वसामान्यांना थक्क करणारा प्रसंग पाहायला मिळाला. ब्रिटनचे प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस केट मिडलटन यांनी भारताचा लाडका क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्यासोबत चक्क रस्त्याकडच्या एका टपरीवर जाऊन गरमागरम चहाचा आनंद घेतला. शाळकरी मुलांसोबत गल्ली क्रिकेटचा मनसोक्त आनंद लुटल्यानंतर या तिघांनीही मातीच्या पारंपरिक ‘कुल्हड’मधून चहा पिताना दिलखुलास गप्पा मारल्या. जगातील इतके मोठे शाही पाहुणे आणि क्रिकेटचा देव आपल्या समोर टपरीवर चहा पिताना पाहून मुंबईकर अक्षरशः भारावून गेले.

टपरीवर रंगल्या शाही गप्पा आणि चहाची चुस्की

या अनोख्या भेटीचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये प्रिन्स विल्यम, प्रिन्सेस केट आणि सचिन तेंडुलकर हातात मातीचा कुल्हड घेऊन चहाचा आस्वाद घेताना आणि मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये प्रिन्स विल्यम तिथे उभ्या असलेल्या एका लहान मुलाशी अतिशय आपुलकीने संवाद साधताना दिसतात, तर दुसरीकडे केट आणि सचिन यांच्यात मैत्रीपूर्ण गप्पा रंगल्या आहेत. कोणत्याही शाही थाटामाटाशिवाय अतिशय साधेपणाने त्यांनी घेतलेला हा चहाचा आस्वाद सर्वांचीच मने जिंकून गेला.

चहावाला मनोजसाठी ठरला आयुष्याचा सुवर्णक्षण

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

ज्या चहाच्या टपरीवर हे दिग्गज थांबले होते, तिथला चहावाला मनोज याचा आनंद तर गगनात मावेनासा झाला आहे. आपल्या भावना व्यक्त करताना मनोज म्हणाला, “मी स्वतः या सर्व पाहुण्यांसाठी चहा बनवला आणि त्यांना दिला. त्यांना तो चहा खूपच आवडला. विशेष म्हणजे, माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला सचिन तेंडुलकर यांना प्रत्यक्ष भेटण्याची आणि चहा पाजण्याची संधी मिळाली. प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस केट यांनीही माझ्या चहाचे भरभरून कौतुक केले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझे मन भरून आले.”

चहापूर्वी क्रिकेटच्या मैदानावरही उडवली होती धमाल

चहा पिण्यासाठी थांबण्यापूर्वी या तिघांनी बॅलार्ड इस्टेट येथेच शाळकरी मुलांसोबत ‘गल्ली क्रिकेट’ खेळण्याचा आनंद घेतला होता. हा खास सामना पाहण्यासाठी परिसरात शेकडो मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी प्रिन्स विल्यम यांनी फलंदाजी केली, तर सचिन तेंडुलकर आणि लहान मुलांनी गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाची धुरा सांभाळली. केट मिडलटन यांनीही बॅट हातात घेऊन फटकेबाजीचा आनंद घेतला. मैदानात पार्श्वभूमीवर ‘जय हो’ हे गाणे वाजत असताना संपूर्ण परिसरात एकच उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण होते.

‘अर्थशॉट प्राईझ’साठी मुंबईत आले आहे शाही जोडपे

प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस कॅथरीन तब्बल दहा वर्षांनंतर भारत दौऱ्यावर सोमवारी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्या या तीन दिवसांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश मंगळवारी, १७ नोव्हेंबर रोजी मुंबईत पार पडणाऱ्या ‘२०२६ अर्थशॉट प्राईझ’ सोहळ्यात सहभागी होणे हा आहे. प्रिन्स विल्यम यांनी सुरू केलेल्या या प्रतिष्ठित पुरस्काराद्वारे हवामान बदल, प्रदूषण, कचरा व्यवस्थापन आणि निसर्ग संवर्धनावर काम करणाऱ्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना सन्मानित केले जाते. यातील पाच विजेत्यांना आपले पर्यावरणपूरक प्रकल्प पुढे नेण्यासाठी प्रत्येकी १० लाख पौंडचे भव्य बक्षीस दिले जाते. यंदा भारतात हा सोहळा होत असल्याने देशातील तरुण उद्योजक आणि पर्यावरण रक्षकांच्या कामाची दखल जागतिक स्तरावर घेतली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here