जळगाव : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना ते छपरा दरम्यान विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०९११५ उधना-छपरा विशेष रेल्वे १६ नोव्हेंबर २०२६ रोजी धावणार आहे. विशेष म्हणजे, या गाडीला उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव आणि भुसावळ या पाच स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
१६ नोव्हेंबरला उधना येथून सुटणार विशेष रेल्वे
पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक ०९११५ उधना-छपरा विशेष रेल्वे सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी उधना स्थानकावरून रवाना होईल. विविध स्थानकांवर थांबे घेत ही गाडी बुधवारी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी छपरा येथे पोहोचणार आहे. गुजरातमधून उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही विशेष रेल्वे सोयीची ठरणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/16/farmers-if-you-want-to-receive-funds-from-government-schemes-in-your-account-complete-your-e-kyc-and-farmer-id/
उत्तर महाराष्ट्रातील पाच स्थानकांवर थांबा
या विशेष रेल्वेचा सर्वाधिक फायदा उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना होणार आहे. गाडीला नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव आणि भुसावळ येथे थांबा देण्यात आला आहे.
गाडीचा मार्ग पुढीलप्रमाणे असेल :
उधना – व्यारा – नंदुरबार – दोंडाईचा – अमळनेर – धरणगाव – भुसावळ – खंडवा – इटारसी – जबलपूर – कटनी – सतना – माणिकपूर – प्रयागराज छिवकी – छपरा.
विशेष म्हणजे, या गाडीला जळगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही. मात्र अमळनेर, धरणगाव आणि भुसावळसह परिसरातील प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
स्लीपर आणि जनरल डबे उपलब्ध
प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष रेल्वेमध्ये स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लासचे डबे असणार आहेत. ही गाडी विशेष भाडे आकारणीच्या नियमानुसार धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढण्यापूर्वी भाडे आणि उपलब्ध आसनांची माहिती तपासून घ्यावी.
आरक्षण कुठे कराल ?
या विशेष रेल्वेचे आरक्षण सुरू झाले असून, प्रवाशांना रेल्वेच्या सर्व पीआरएस आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करता येणार आहे. आरक्षित तिकिटावर प्रवास करताना मूळ ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. गाडीचे वेळापत्रक, थांबे आणि तिकीटविषयक अधिक माहितीसाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.