मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा वारसा जपणाऱ्या आणि कला क्षेत्रात आपल्या योगदानाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मान्यवरांचा लवकरच सन्मान करण्यात येणार आहे. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या ‘मृद्गंध पुरस्कार 2026’साठी यंदा विविध क्षेत्रांतील मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अभिनेत्री अमृता सुभाष, अभिनेते आणि दिग्दर्शक संदेश कुलकर्णी यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे.
26 नोव्हेंबरला रंगणार स्मृती संगीत समारोह
लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या 16व्या स्मृतिदिनानिमित्त 16व्या लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, 26 नोव्हेंबर रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे सायंकाळी 6 वाजता हा सोहळा पार पडणार आहे. विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ‘मृद्गंध पुरस्कार 2026’ प्रदान केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे.(Amruta Subhash)
https://www.prahaar.in/2026/11/16/girgaon-comes-alive-with-the-vibrant-expressions-of-folk-art-at-the-lokparampara-mahotsav-folk-tradition-festival/
कोणाकोणाची झाली पुरस्कारासाठी निवड?
यंदाच्या पुरस्कारांमध्ये विविध कला क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. पद्मश्री तालयोगी श्री सुरेश तळवलकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर लोककला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांची निवड करण्यात आली आहे. छायाचित्रण आणि पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री सुधारक ओळवे, अभिनय आणि दिग्दर्शनासाठी संदेश कुलकर्णी, अभिनय क्षेत्रासाठी अभिनेत्री अमृता सुभाष, तर नवोन्मेष प्रतिभा-गायक या विभागात चैतन्य देवडे (माऊली) यांना ‘मृद्गंध पुरस्कार 2026’ प्रदान केला जाणार आहे.(Pride Of Maharashtra)
काय आहे पुरस्काराचे स्वरूप?
या पुरस्काराचे स्वरूपही विशेष आहे. सन्मानित करण्यात येणाऱ्या प्रत्येक मान्यवराला शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांची प्रतिकृती असलेले आकर्षक मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.(Sandesh Kulkarni)
https://www.prahaar.in/2026/11/16/teen-tigada-web-series-a-unique-blend-of-love-cricket-and-music-trailer-for-the-teen-tigada-web-series-released/
लोककलेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प
लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी भारूड, गोंधळ आणि पोवाडा अशा लोककलेच्या विविध प्रकारांतून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कलेतून केवळ मनोरंजनच नव्हे, तर सामाजिक जनजागृतीचाही संदेश दिला जात असे. त्यांचा हाच समृद्ध कलावारसा पुढे नेण्याचे काम विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या माध्यमातून केले जात आहे. विठ्ठल उमप यांचे चिरंजीव आणि फाऊंडेशनचे अध्यक्ष गायक नंदेश उमप यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. लोककलेला प्रोत्साहन देणे, नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि समाजाप्रती आपली जबाबदारी जपणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. यंदाच्या सोहळ्याच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाही मदतीचा हात दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सांगीतिक मानवंदनेने रंगणार सोहळा
या कार्यक्रमात पार्श्वगायिका प्रियांका बर्वे, अरुण पेदे वेसावकर आणि त्यांचे सहकारी आपल्या सादरीकरणातून लोकशाहीर विठ्ठल उमप यांना सांगीतिक मानवंदना अर्पण करणार आहेत. अभिनेत्री डॉ. समीरा गुजर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. एकूणच, लोककलेचा सन्मान, नव्या कलाकारांना प्रोत्साहन आणि ज्येष्ठ कलावंतांच्या कार्याची दखल घेणारा हा सोहळा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.(Mrudgandha Awards 2026)