पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. रविवारी आणि सोमवारी म्हणजेच 2 दिवस शहरातील काही प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच अनेक ठिकाणी वाहनांच्या पार्किंगवर बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी हे बदल केले आहेत. त्यामुळे या दोन दिवसांत घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांनी प्रवासाचे नियोजन करूनच बाहेर पडावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
पुणे जिल्हा परिषद परिसरात आयोजित कार्यक्रमासाठी दोराबजी मॉल ते हॉटेल ब्लू नाईल चौक हा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. कार्यक्रमाला येणाऱ्या नागरिकांसाठी एसजीएस मॉल, पूना क्लब, लेडीज क्लब, किराड चौक, पुणे पोलीस आयुक्तालय परिसर, इस्कॉन मंदिर आणि ब्लू नाईल चौक येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/15/the-onset-of-a-pleasant-mild-chill-in-maharashtra-cooler-conditions-felt-during-the-early-morning-and-at-night-what-will-the-weather-be-like-over-the-next-few-days/
या प्रमुख रस्त्यांवर पार्किंग बंद
रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी लोहगाव हवाई दलाचा तळ ते विमाननगर रस्ता आणि रामवाडी ते मुंढवा येथील भारत फोर्ज कंपनीपर्यंतच्या मार्गावर वाहनांना पार्किंग करता येणार नाही. याशिवाय कोरेगाव पार्कमधील नॉर्थ मेन रोड, जहांगीर हॉस्पिटल चौक, अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, नेहरू मेमोरियल चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक आणि फर्ग्युसन रस्त्यावरही पार्किंगला बंदी असेल.
तसेच खुडे चौक, संगमवाडी ते येरवड्यातील शाहदावलबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते गोल्फ क्लब रस्ता आणि 509 चौक ते लोहगाव हवाई दलाचा तळ या मार्गांवरही वाहने उभी करता येणार नाहीत.
सोमवारी वाहतुकीत विशेष बदल
सोमवारी सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे अमित शहा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे सकाळी 9 वाजल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत टिळक रस्ता, महाराष्ट्र साहित्य परिषद, बादशाही हॉटेल आणि भरत नाट्य मंदिर परिसरात पार्किंगला मनाई असेल.
याशिवाय सकाळी 7 वाजल्यानंतर किराड चौक ते नेहरू मेमोरियल हॉल चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांनी किराड चौकातून जीपीओ मार्गे हॉटेल ब्लू नाईल चौकाकडे जावे आणि पुढे आपल्या इच्छित ठिकाणी जावे, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुणेकरांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.