संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादच्या सीईओ काव्या मारन यांचा विवाह ग्रीसमध्ये पार पडला. या सोहळ्याला चित्रपट, राजकारण आणि क्रिकेट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र या लग्नातील पाहुण्यांच्या यादीपेक्षा जास्त चर्चा झाली ती या जोडप्याने निवडलेल्या विवाह पद्धतीची.या दोघांनी पारंपरिक हिंदू विवाहातील मोठे विधी न करता, सेल्फ रिस्पेक्ट पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत दोघांनी एकमेकांना हार घातले आणि चेनची देवाणघेवाण केली.अनिरुद्ध काव्याच्या गळ्यात चेन घालत असतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या लग्नाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यावर डीएमकेचे आयटी विभाग सचिव डॉ. टी. आर. बी. राजा यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, काव्या आणि अनिरुद्ध यांनी एकमेकांना हार घातले. यावेळी रजनीकांत यांनी काव्याला चेन दिली, तर एम. के. स्टॅलिन यांनी अनिरुद्धला चेन दिली. त्यानंतर वधू-वराने एकमेकांना चेन घातली आणि उपस्थितांनी त्यांच्या नव्या आयुष्यासाठी आशीर्वाद दिले.
सेल्फ रिस्पेक्ट विवाह म्हणजे काय?
तामिळमध्ये याला सुयमरियादै तिरुमणम असे म्हटले जाते. समाजसुधारक पेरियार ई. व्ही. रामासामी यांनी सुरू केलेल्या स्वाभिमान चळवळीतून ही पद्धत पुढे आली. जातीव्यवस्था, सामाजिक विषमता आणि विवाहात धार्मिक अधिकाराला दिले जाणारे महत्त्व याला या चळवळीने विरोध केला होता.या विवाहात पुरोहिताची किंवा मोठ्या धार्मिक विधींची गरज नसते. जोडपे साक्षीदारांसमोर एकमेकांना वचन देते आणि हार किंवा अंगठीची देवाणघेवाण करते. यामध्ये दोघांची संमती आणि समानता याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते.१९६७ मध्ये तामिळनाडूने हिंदू विवाह कायद्यात दुरुस्ती करून या विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. त्यामुळे पारंपरिक विधींशिवायही असा विवाह कायदेशीर मानला जातो.
https://www.prahaar.in/2026/11/12/aniruddh-and-kavyas-wedding-took-place-with-great-pomp-photos-from-the-wedding-in-greece-have-emerged/
या जोडप्याच्या कुटुंबीयांकडून २१ नोव्हेंबर रोजी विवाह सोहळ्यानिमित्त एका रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले असून, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या संगीत दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या अनिरुद्धने २०१२ मध्ये, धनुष अभिनीत ‘३’ (3) चित्रपटातील ‘व्हाय दिस कोलावेरी डी’ (Why This Kolaveri Di) हे गाणे व्हायरल झाल्यानंतर मोठी प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर त्याने ‘कथी’, ‘वेदालम’, ‘मास्टर’, ‘बीस्ट’, ‘विक्रम’, ‘पेट्टा’, ‘दरबार’, ‘जेलर’, ‘वेट्टैयन’ आणि ‘कुली’ यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी संगीत दिले आहे.