Home महत्वाची बातमी Mumbai 26/11 attack : मुंबईतील २६/११ च्या नरिमन हाऊसची रेकी केल्याप्रकरणी २० वर्षीय तरुणाला अटक

Mumbai 26/11 attack : मुंबईतील २६/११ च्या नरिमन हाऊसची रेकी केल्याप्रकरणी २० वर्षीय तरुणाला अटक

0
Mumbai 26/11 attack :  मुंबईतील २६/११ च्या नरिमन हाऊसची रेकी केल्याप्रकरणी २० वर्षीय तरुणाला अटक
मुंबईतील २६/११ च्या नरिमन हाऊसची रेकी केल्याप्रकरणी २० वर्षीय तरुणाला अटक (Google Photo)

मुंबई : मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलेल्या कुलाबा येथील नरिमन हाऊससह शहरातील काही संवेदनशील ठिकाणांची टेहळणी केल्याच्या आरोपावरून २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. यश सिंग असे या तरुणाचे नाव असून, तो नवी मुंबईतील ऐरोली परिसरात राहणारा आहे. शनिवारी नवी मुंबईत ही कारवाई करण्यात आली. ( Mumbai terror attack)

पोलिसांच्या माहितीनुसार, सिंग परदेशातील सूत्रधारांच्या संपर्कात होता. त्याला मुंबईतील ज्यू नागरिक, परदेशी नागरिक आणि त्यांच्या व्यवसायांची माहिती गोळा करण्याचे काम देण्यात आले होते. यासाठी तो संबंधित व्यक्तींची छायाचित्रे, वाहनांचे तपशील आणि ठिकाणांची अचूक माहिती गोळा करून ती आपल्या संपर्कातील व्यक्तींना पाठवत असल्याचा आरोप आहे. ( Nariman House)

सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कशी त्याचे संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर नवी मुंबई दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) तपास सुरू केला. या तपासादरम्यान सिंगच्या कारवायांचा संबंध केरळमधील त्रिशूर येथे बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (यूएपीए) दाखल असलेल्या एका प्रकरणाशी असल्याचे समोर आले. त्यानंतर केरळ पोलिसांनाही या तपासात सहभागी करून घेण्यात आले.

एटीएसकडून माहिती मिळाल्यानंतर केरळ पोलिसांचे पथक नवी मुंबईत दाखल झाले. सिंगच्या कथित कारवायांची आणि केरळमधील प्रकरणाशी असलेल्या संबंधांची चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

पोलिसांच्या आरोपानुसार, बेरोजगार आणि आर्थिक अडचणीत असलेल्या तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष्य केले जात होते. टेलिग्राम, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसारख्या माध्यमांतून त्यांच्याशी संपर्क साधून संवेदनशील ठिकाणांची माहिती गोळा करण्याच्या बदल्यात पैशांचे आमिष दाखवले जात असल्याचा संशय आहे. या प्रकरणात पाकिस्तानी दहशतवादी शहजाद भट्टीशी संबंधित नेटवर्कचा सहभाग असल्याचाही पोलिसांचा दावा आहे.

नरिमन हाऊस हे मुंबईतील महत्त्वाचे ज्यू धार्मिक केंद्र आहे. नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यादरम्यान या इमारतीला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे ३०० जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here