मुंबई (विशेष प्रतिनिधी)
केईएम रुग्णालयात आधीच येथील ओपीडी मध्ये रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णांना उपचार मिळण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, या समस्या असतानाच आता या केईएम रुग्णालयातील सेठ धुरमल बजाज अस्थिव्यंग केंद्रामध्ये रुग्णांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहे. या रुग्णालयातील लिफ्ट मागील काही दिवसांपासून बंद असून या लिफ्ट अभावी पायाला फॅक्चर असल्याने प्लॅस्टर केलेल्या रुग्णाला जिन्यावरून घसरत घसरत उतरावे लागत आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबई महापालिका रुग्णालयात दरवर्षी हजारो कोटी रुपयांची तरतूद गरीब रुग्णांच्या वैद्यकीय उपचारावर खर्च केले जात असले तरी रुग्णाला जिन्यावरून घसरत उतरावे लागते. पायाला प्लास्टर असलेला एक वृद्ध रुग्ण जिन्याच्या पायऱ्यांवर बसून, एकेक पायरी घसरत खाली उतरत आहे. त्यांना व्हीलचेअर नाही, स्ट्रेचर नाही, आधाराला कर्मचारी नाही. बाजूने लोक ये-जा करत आहेत, पण कोणीही मदतीला येत नाही. प्लास्टर घातलेल्या पायाला धक्का लागला तर फ्रॅक्चर बिघडू शकते, रुग्ण पडू शकतो. आणि त्यांचा जीवही धोक्यात येऊ शकतो.आपण या आरोग्य व्यवस्थेवर हजारो कोटी रुपये खर्च करत असतो आणि जर आपण उपचार करण्यास येणाऱ्या रुग्णांसाठी लिफ्टची सुविधा देऊ शकत नसू तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. महापालिकेची प्रतिमा यामुळे मलिन होत असून याप्रकरणी यांत्रिक आणि विद्युत विभागाचे अधिकारी दोषी आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/12/navi-mumbai-ranks-first-in-the-country-in-swachh-survekshan-2025-26-secures-the-top-spot-by-surpassing-4751-cities/
या लिफ्टचे मेंटेनेन्स का नाही झाले? जर लिफ्ट खराब झाली होती तर ती बदलण्यासाठी का प्रयत्न झाले नाही?. कुणी यांना या लिफ्टचे काम करू नका म्हणून सांगितले होते का? कुणी यांचे प्रस्ताव रोखून ठेवले होते का? खरं तर माझी कुणाला दोष देण्याची इच्छा नाही. पण यांत्रिक व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांची ज्या प्रकारे मनमानी सुरू आहे, त्यामुळे के.ई.एम रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होतो. महापालिका रुग्णालयांची बदनामी होतो. यामुळे नाहक रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. मग ती सेवा एम.आर.आय.ची असो सिटी स्कॅनची सेवा असो वा लिफ्टची सेवा असो.यामध्ये त्यांचे अजिबात लक्ष दिसून येत नाही. त्यामुळे सर्व प्रथम यांत्रिक व विद्युत विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करून त्यांना त्या पदावरून बाजूला करावे असे निर्देश मी प्रशासनाला देत आहे.
केईएम रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार केंद्रातील बंद लिफ्ट बाबत वस्तुस्थिती अहवाल दहा दिवसात..
उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) यांची चौकशी समिती गठीत राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रुग्णालयाच्या अस्थिव्यंगोपचार केंद्रातील लिफ्ट बंद असल्याबाबत विविध प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसारित झाल्या आहेत. या वृत्तांच्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने याची गंभीर नोंद घेतली असून रुग्णाची वैद्यकीय स्थिती तसेच लिफ्ट बदलण्याच्या कामकाजाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य ) यांच्या स्तरावर एक समिती गठीत केली आहे. येत्या येत्या दहा दिवसांत वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांनी दिले आहेत. या समवेतच भविष्यात अशा स्वरूपाच्या घटना घडू नये यासाठी प्रमाणित कार्यपद्धती ( (एस ओ पी) निश्चित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान,या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित प्रभारी युनिटप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
अस्थिव्यंगोपचार केंद्रातील जुनी लिफ्ट ही ३९ वर्षांची आहे. ही लिफ्ट बदलण्यासाठी अस्थिव्यंगोपचार विभागातील रुग्णसेवा, विशेषतः स्वतः चालू न शकणाऱ्या रुग्णांची पर्यायी व्यवस्था तसेच त्यांच्या सुरक्षित स्थलांतराशी संबंधित व्यावहारिक अडचणींमुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब झाला. लिफ्टचे वाढते वयोमान, सातत्याने होणारी झीज आणि त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने लिफ्टची तातडीने बदली करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. जुनी लिफ्ट बदलण्याचे काम तसेच लिफ्टच्या शाफ्टमधील आवश्यक दुरुस्तीची कामे केईएम रुग्णालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत करण्यात येत आहे.