नवी दिल्ली : आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2027 च्या लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल आगामी हंगामात संघाचे नेतृत्व करण्यास अनुत्सुक असल्याचे समजते. त्याने कर्णधारपद सोडण्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे. अक्षरच्या या भूमिकेमुळे फ्रँचायझी व्यवस्थापनासमोर पेच निर्माण झाला असून संघात खळबळ उडाली आहे.
कर्णधारपदाचा ताण वैयक्तिक कामगिरीवर परिणामकारक?
मिळालेल्या वृत्तानुसार, गेल्या 2 हंगामांत दिल्लीच्या संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. कर्णधारपदाच्या अतिरिक्त दबावाचा परिणाम अक्षर पटेलच्या वैयक्तिक फलंदाजी आणि गोलंदाजीवर झाल्याचे सांगितले जात आहे. IPL 2026 च्या हंगामात 14 सामन्यांमध्ये त्याला केवळ 173 धावा करता आल्या, तर 11 बळी मिळवता आले. या कामगिरीनंतर नेतृत्वाच्या जबाबदारीचा ताण लक्षात घेता त्याने कर्णधारपद सोडण्याचा विचार केल्याची चर्चा आहे.
अक्षर पटेलला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी अनेक फ्रँचायझींनी दिल्ली व्यवस्थापनाशी संपर्क साधल्याचेही वृत्त आहे. काही आकर्षक ट्रेड ऑफर्स देण्यात आल्याची चर्चा असली, तरी अक्षर हा संघाचा महत्त्वाचा खेळाडू असल्याने दिल्लीने या ऑफर्स स्वीकारलेल्या नाहीत. फ्रँचायझी व्यवस्थापन सध्या अक्षरची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असून, लिलाव प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कर्णधारपदाबाबतचा अंतिम निर्णय राखून ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
https://www.prahaar.in/2026/11/12/team-india-flight-took-a-full-26-minutes-to-land-players-left-anxious-in-wellington-new-zealand-what-exactly-happened/
संघात मोठे बदल आणि ऋषभ पंतचे पुनरागमन
आगामी हंगामाच्या लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये मोठे फेरबदल केल्याचे वृत्त आहे. सौरव गांगुली यांनी मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांच्यासोबत युवराज सिंह, चमिंडा वास आणि अमित मिश्रा यांचा सपोर्ट स्टाफमध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, लखनौ सुपर जायंट्सकडून खेळल्यानंतर फ्रँचायझीचा माजी कर्णधार आणि प्रमुख खेळाडू ऋषभ पंत याचे पुन्हा दिल्लीच्या संघात पुनरागमन झाल्याची चर्चा आहे. संघात मोठे बदल होत असताना कर्णधारपदाबाबतची अनिश्चितता दूर करण्याचे आव्हान आता व्यवस्थापनासमोर आहे.
अक्षर पटेलच्या कर्णधारपदाबाबतचा अंतिम निर्णय काय असेल आणि आगामी हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व कोण करणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.