मुंबई : अंधेरी पूर्वेकडील चकाला परिसरात एलपीजी सिलिंडरच्या मुख्य व्हॉल्व्हमधून आगीचा भडका उडाल्याची घटना गुरुवारी (12 नोव्हेंबर) रात्री घडली. या आगीत आई आणि मुलगी अशा 2 महिला भाजल्या असून, त्यांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये 35 वर्षीय महिला आणि 13 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघींची प्रकृती स्थिर आहे.
स्वयंपाकघरात सिलिंडरच्या व्हॉल्व्हमधून आगीचा भडका
मुंबईतील काजूवाडी, खांडेश्वर मंदिराजवळील बोंबारी चाळ येथे रात्री 7 वाजून 35 मिनिटांनी आगीची घटना घडली. तळमजला आणि पहिला मजला असलेल्या इमारतीतील तळमजल्यावरील खोली क्रमांक 2 मधील स्वयंपाकघरात एलपीजी सिलिंडरच्या मुख्य व्हॉल्व्हमधून अचानक आगीचा भडका उडाला. सुमारे 3 बाय 3 चौरस फुटांच्या परिसरात आग मर्यादित राहिली. या आगीत सिलिंडरचा मुख्य व्हॉल्व्ह, दोन्ही महिलांचे कपडे आणि दिव्यासह काही वस्तूंचे नुकसान झाले.
https://www.prahaar.in/2026/11/12/in-mumbai-a-total-of-499-fire-incidents-occurred-over-five-days-as-many-as-333-of-these-were-caused-by-firecrackers/
आई-मुलगी भाजल्या; कूपर रुग्णालयात उपचार सुरू
या घटनेत रुतीका गौड (वय 35) या 25 टक्के भाजल्या, तर नेहा गौड (वय 13) या 14 टक्के भाजल्या आहेत. दोघींनाही पोलिसांच्या वाहनातून कूपर रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री 9 वाजून 1 मिनिटाने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, 108 रुग्णवाहिका सेवा आणि वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. रात्री 8 वाजून 4 मिनिटांनी आग पूर्णपणे विझविण्यात आली.