प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या एका वादावर अखेर मौन सोडले आहे. त्यांच्या नावाने फेसबुकवर फिरत असलेली एक पोस्ट बनावट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आपले अधिकृत सोशल मीडिया खाते फक्त इंस्टाग्रामवरच असल्याचे त्यांनी चाहत्यांना सांगितले आहे. बिग बॉस २० मधील स्पर्धक स्काऊट ओपी आणि लव्ह गिल यांच्यावर कॉमेडियन गौरव गुप्ता यांनी केलेल्या रोस्टवर रोहित शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिल्याचा दावा करणारी एक पोस्ट फेसबुकवर व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये, “मैत्रीपूर्ण रोस्टिंग ठीक आहे, पण रोस्टिंगच्या नावाखाली कोणाचीही खिल्ली उडवणे थांबले पाहिजे. हसवणे चांगली गोष्ट आहे, पण कोणाला रडवून किंवा अपमान करून हसवणे योग्य नाही. सर्वांचा आदर करा,” असे लिहिले होते.
ही पोस्ट वाचून अनेकांना वाटले की ही प्रतिक्रिया रोहित शेट्टी यांचीच आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. मात्र, ही पोस्ट आपली नसल्याचे रोहित यांनी स्पष्ट केले आहे. रोहित यांनी इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले आहे की, “माझी एकमेव अधिकृत सोशल मीडिया उपस्थिती इंस्टाग्रामवर आहे. मी फेसबुक किंवा एक्सवर नाही. या प्लॅटफॉर्मवर माझ्या नावाने असलेले कोणतेही खाते बनावट आणि अनधिकृत आहे. अशा खात्यांशी संपर्क साधू नका किंवा त्यावरून येणारी माहिती माझी समजू नका.”
https://www.prahaar.in/2026/11/04/i-dont-even-want-the-money-mahhi-vij-expresses-her-outrage-will-she-exit-bigg-boss-20/
गौरव गुप्ता रोस्ट वाद काय आहे?
नुकतेच बिग बॉस २० च्या दिवाळी विशेष भागात कॉमेडियन गौरव गुप्ता आला होता. या भागात त्याने अनेक स्पर्धकांवर विनोदी टिप्पणी केली. यात स्काऊट ओपी म्हणजेच तन्मय सिंह आणि लव्ह गिल यांच्यावरही त्याने विनोद केले. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि नात्यांवर केलेले काही विनोद स्पर्धकांना आवडले नाहीत. त्यानंतर हा वाद सोशल मीडियावर रंगला. या वादात रोहित शेट्टी यांचे नाव जोडले गेल्याने त्यांना खुलासा करावा लागला. बनावट खात्यांपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी चाहत्यांना केले आहे.