पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने छत्तीसगढमधील बस्तरला भेट दिली. त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांनी नक्षलवादाच्या निर्मूलनाबद्दल सैनिकांचे अभिनंदन केले आणि सांगितले की ही पहिली दिवाळी आहे, ज्यात देश नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त झाला आहे. मात्र त्यांनी राजकीय विरोधकांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, नक्षलवाद जरी समूळ नष्ट झाला असला तरी अजूनही काही मानसिक नक्षलवादी शिल्लक आहेत जे लोकांना भडकवत आहेत आणि आपण त्यांचा पराभव केलाच पाहिजे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आपल्या शूर सैनिकांसोबत घालवलेली प्रत्येक दिवाळी माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. ही तीच भूमी आहे जिने एकेकाळी नक्षलवादी दहशतीचा कहर सोसला होता, परंतु तुमच्या बलिदानामुळे आणि समर्पणामुळे येथे नक्षलवादी दहशत संपुष्टात आली आहे आणि विकासाची नवी लाट सुरु झाली आहे.’ पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, आयआरबी आणि राज्य पोलीस दलातील जवानांचा देश ऋणी राहील. बस्तर फायटर्ससारख्या विशेष तुकड्यांमधील कमांडो आणि महिला सैनिकांनीही या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बस्तरमध्ये सुरक्षा दलांसोबत साजरी केली दिवाळी; जवानांना भरवले गोड धोड
.
.
#prahaarnewsline #marathinews #NarendraModi https://t.co/17D4wc0cSy— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) November 8, 2026
पंतप्रधान मोदी बस्तरमधून म्हणाले की, जेव्हा आपण राष्ट्र प्रथम या भावनेने काम करतो, तेव्हा देशाची शांतता आणि सुरक्षाही सुनिश्चित होते. देश विकासाची नवी शिखरे गाठतो, आणि विकासात प्रत्येक गरीब व वंचित व्यक्तीचा सहभागही वाढतो. म्हणूनच, गेल्या १२ वर्षांत देशाने केवळ नक्षलवाद आणि फुटीरतावादाविरुद्धची लढाईच जिंकली नाही, तर गरिबीविरुद्धची एक मोठी लढाईही जिंकली आहे. यावेळी दिवाळीच्या अगदी आधी अशी एक बातमी आली आहे, ज्याची चर्चा संपूर्ण देशात आणि जगभरात होत आहे. काही दिवसांपूर्वीच, जागतिक बँकेने (World Bank) आपल्या रिपोर्टमध्ये असे सांगितले आहे की भारतात गेल्या १२ वर्षांत ५० कोटी लोक भीषण गरिबीतून बाहेर आले आहेत. जे काम कित्येक वर्ष गरिबी हटाओचे नारे लावून झालं नाही ते १२ वर्षांत करून दाखवलं.
https://www.prahaar.in/2026/11/08/pm-narendra-modi-celebrate-diwali-2026-in-bastar-naxal-area-with-bastar-jawans/
महायुती सरकारच्या काळातील विकासकामांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आम्ही गरिबांसाठी कल्याणकारी योजनांचे एक जाळे विणले आहे, ज्यांनी त्यांना सातत्याने सक्षम केले आहे. ‘जन धन योजने’च्या माध्यमातून कोट्यवधी लोकांना बँकिंग प्रणालीशी जोडले गेले आहे. ‘पंतप्रधान आवास योजने’ने कोट्यवधी कुटुंबांना डोक्यावर कायमस्वरूपी छप्पर मिळवून दिले आहे. ‘मुद्रा योजने’अंतर्गत आम्ही व्यक्तींना तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ‘स्वनिधी योजने’द्वारे आम्ही पथविक्रेत्यांनाही आधार दिला आहे. आता त्यांना आपला व्यवसाय विस्तारण्याची संधी मिळत आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत, आम्ही गरिबांना मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले. आम्ही दरमहा लाखो कुटुंबांना मोफत रेशन पुरवले आणि मुलांच्या शिक्षणासाठी धोरणे आखली.
थोडक्यात सांगायचे तर, आम्ही प्रत्येक गरीब कुटुंबासाठी मोफत आरोग्यसेवा, मोफत शिक्षण आणि मोफत स्वयंपाकाचे इंधन (स्वयंपाकाच्या गॅसची उपलब्धता) सुनिश्चित केले.’ या सर्व योजनांमुळे भारत आज गरिबीतून मुक्त होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
‘जेव्हा आम्ही नक्षलवादाविरुद्ध लढा सुरू केला, तेव्हा त्याच वेळी आम्ही नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी विशेष उपक्रमही हाती घेतले. आम्ही डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी प्रभावाखालील प्रदेशांत १५,००० किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते बांधले. हे रस्ते पूर्ण सुरक्षा व्यवस्थेसह उभारण्यात आले. या भागांत ९,००० हून अधिक मोबाईल टॉवर्स बसवण्यात आले आहेत. आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी सुमारे १७५ ‘एकलव्य शाळा’ सुरू करण्यात आल्या. तरुणांना रोजगाराच्या संधींशी जोडण्यासाठी सुमारे ५० आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) स्थापन करण्यात आल्या. सुमारे ५० कौशल्य विकास केंद्रे उभारण्यात आली. हजारो पोस्ट ऑफिस, बँक शाखा आणि एटीएम सुरू करण्यात आले. त्यासोबतच आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना संधीदेखील देण्यात आली.’