लोकप्रिय रिॲलिटी टीव्ही शो ‘बिग बॉस’ चा 20 वा सिझन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सलमान खानच्या सूत्रसंचालनापासून ते घरातील स्पर्धकांमधील कुरबुरींपर्यंत शोचा प्रत्येक पैलू चर्चेचा विषय ठरतो. कधी सलमान खानचा शर्टलेस लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे तर कधी त्याने स्पर्धकांना दिलेल्या कानपिचक्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, घरातील वादविवाद आणि मनोरंजक कार्यांनी प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले. या सीझनने आता मागील सर्व सीझन्सना मागे टाकत प्रेक्षकसंख्येचा विक्रम प्रस्थापित केला आहे. इतकेच नाही तर घराला त्याचा नवीन कॅप्टनदेखील मिळाला आहे.
बिग बॉस 20 ने रचला इतिहास
नुकताच या शोचा एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये सलमान खानने ‘विकेंड का वार’ दरम्यान खुलासा केला की, बिग बॉस 20 ने 60 दिवस पूर्ण होण्यापूर्वीच जिओ हॉटस्टारवर 100 कोटी तासांचा व्ह्यू टाइम गाठला आहे. यामुळे शोच्या दोन दशकांच्या प्रवासात इतक्या लवकर हा टप्पा गाठणारा हा पहिलाच सीझन ठरला आहे. या सीझनमध्ये केवळ प्रेक्षकसंख्येतच वाढ झाली नाही तर चाहत्यांनी मतदानातही प्रचंड उत्साह दाखवला. प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, या सीझनला आतापर्यंत 3.5 अब्जाहून अधिक मते मिळाली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/07/harry-boxer-the-mastermind-behind-the-firing-incident-at-rohit-shettys-residence-is-now-in-police-custody/
दरम्यान, जिओस्टारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, मागील सीझनच्या तुलनेत मतदानात 71 टक्के आणि मतदान करणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत 48 टक्के वाढ झाली आहे. ही आकडेवारी सिद्ध करते की दोन दशकांनंतरही बिग बॉस प्रेक्षकांची आवड कायम राखत आहे. किंबहुना, या सीझनमधील चाहत्यांच्या सक्रिय सहभागाने शोची लोकप्रियता नव्या उंचीवर नेली आहे. केवळ भारतीय प्रेक्षकांपुरता हा शो मर्यादित नसून या सीझनला आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जिओ हॉटस्टारवर हा शो UK, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये सातत्याने टॉप 5 शोमध्ये स्थान मिळवतो. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) देखील हा शो प्रचंड लोकप्रिय आहे.